तोंडवळी ग्रामस्थ रस्त्यासाठी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

तोंडवळी ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला एकमुखी निर्णय
मालवण तालुक्यातील तोंडवळी हा गाव नैसर्गिक आपत्ती मध्ये येतो. तोंडवळी गावा मध्ये जाणारा ऐकमेव रस्ता तोंडवळी फाटा ते महापुरूष मंदिर या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेली अनेक वर्षे वेळोवेळी लक्ष वेधून, उपोषणे करून देखील कोणतीही कार्यवाही आजपर्यंत न झाल्याने तोंडवळी ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आलेल्या खास ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून या रस्त्यासाठी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला.
तोंडवळी फाटा ते महापुरूष मंदिर या रस्त्याची खड्डे पडून झालेली रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासन प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी तोंडवळी ग्रामपंचायतीमध्ये खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तोंडवळी ग्रामपंचायतच्या सभागृहात तोंडवळी गावाची खास ग्रामसभा तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी माजी सरपंच आबा कांदळकर,तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर,जयहरी कोचरेकर, नाना पाटील, उपसरपंच हर्षद पाटील,ग्रामसेवक युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अनन्या पाटील, मानसी चव्हाण, नरेंद्र मेस्त,भुपाल मालंडकर, सुजाता पाटील तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
गावात जाणारा एकमेव रस्ता बनला धोकादायक
तोंडवळी फाटा ते महापुरूष मंदिर पर्यंतचा रस्ता डांबरीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वाहने चालविताना अनेक अडचणी येत असून प्रसंगी अपघात होण्याची शक्यता आहे.तसेच तोंडवळी, तळाशील मध्ये येणाऱ्या एस टी बस बंद होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
तसेच तोंडवळी गाव हा पर्यटन दृष्ट्या गाव असून खराब झालेल्या रस्त्यामुळे गावात येणाऱ्या पर्यटकांनाही यांचा नाहक त्रास सहन होत असून याचा परिणाम पर्यटनावर देखील होतं आहे. मागील वर्षी या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण होण्यासाठी दिनांक १ मार्च २०२३ रोजी उपोषण केले होते. तसेच दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी तोंडवळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर काम आठ दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप पर्यत याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही असे ग्रामस्थ म्हणाले.
अधिकाऱ्यांनी व शासनाने ग्रामस्थांची मागणी वेळोवेळी धुडकावून लावलेली आहे. गेल्या वर्षाच्या बजेटमध्ये तोंडवळी गावामधील रस्त्यासाठी निधी प्राप्त झालेला नाही. रस्ता हि गावाची मुलभूत गरज असून पुर्व बाजूला गड नदीची खाडी व पश्चिमेला बाजुला अरबी समुद्र आणि दक्षिणेला नदी व समुद्राच्या संगम आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास तोंडवळी फाटा ते महापुरुष मंदिर हा रस्ता तोंडवळी गावासाठी एकमेव दळणवळणाचे साधन आहे. तसेच सुरुबन रस्ता डांबरीकरण करणेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे Environmental Clearance कडे सादर केलेली असून सुद्धा याबाबत ही अद्याप पर्यत कोणतीही कार्यवाही करणेत आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी सभेत केला. वारंवार वरिष्ठ कार्यालयाशी व लोकप्रतिनिधीशी पत्रव्यवहार करून देखील रस्ता मंजुर होत नसल्याबाबत उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आलेले आहे.