गोड वाणीने जगतमित्र होता येते – सौ सुस्मिता राणे
प्रतिनिधी । कुडाळ : गोड वाणीने जगत मित्र होता येते. प्रेमाने अनेकांना आपलेसे करता येते. त्यासाठी महिलांनी आयुष्यात योग्य समायोजन केले पाहिजे. तसेच सकारात्मक विचार जोपासायला हवेत असे प्रतिपादन नारिशक्ती समिती सिंधुदुर्गच्या सदस्या तसेच ज्येष्ठ समाजसेविका,तुळसुली हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ. सुस्मीता राणे यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग च्या वतीने बही:शाल शिक्षण मंडळाच्या विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सौ.सुस्मिता राणे बोलत होती.
सौ. राणें पुढे म्हणाल्या, आजची बदलती जीवनशैली, ताणतणाव, कुटुंबाची जबाबदारी आणि आयुष्यातील अनेक स्थित्यंतरे ह्या आणि अशा अनेक जबाबदाऱ्या एक स्त्री म्हणून पार पाडाव्या लागतात या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.त्यामुळे स्त्रियांचा स्वतः प्रति आणि समाजाप्रती असणारा सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. ती सृजनशील आहे. नवनिर्मिती हे त्यांचे मूळ आहे ,म्हणूनच म्हटले जाते की “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी”. समस्त स्त्री वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार देखील अनेक योजनांची अंमलबजावणी करते. याविषयी स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे .कुटुंबाचा मिळणारा पाठिंबा आणि समाजामध्ये असलेले तिचे स्थान ह्या सर्व गोष्टीं तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतात .एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते आणि पर्यायाने समाज पुढे जातो ,ही एक साखळी आहे आणि ती जर सातत्याने चालू राहायला हवी तर महिलांनीही हिरीरीने सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे .या शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर बॅ नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या सौ .मीना जोशी ,उप- प्राचार्या सौ.कल्पना भंडारी, प्रा. श्रीम. वैशाली ओटवणेकर ,शांभवी आजगावकर-मार्गी ,प्रणाली मयेकर,सुमन करंगले-सावंत, प्रियांका माळकर ,रेशमा कोचरेकर, गौतमी माईणकर, ऋग्वेदा राऊळ, कृतिका यादव ,वैजयंती नर उपस्थित होत्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्रीमती वैजयंती नर तर आभार प्रदर्शन प्रणाली मयेकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.