छुप्या पद्धतीने मटका पुन्हा सुरू, मटक्याला शहरालगत क्लबचा पर्याय खुला

अनेक ठिकाणी अवैध दारू धंदे देखील जोरात
पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना गेले काही दिवस आळा बसलेला असताना कणकवली तालुक्यात काही महिने बंद असल्याचे दाखविले जाणारा मात्र छुप्या पद्धतीने सुरू असणारा मटका व अवैध दारू धंदे पुन्हा एकदा जोर धरू लागले आहेत. त्यातच गेले काही दिवस मटका छुप्या पद्धतीने सुरू असल्याने त्याला पर्याय म्हणून कणकवली शहरा लगत असलेल्या एका महामार्ग लगतच्या गावात सोशल क्लब च्या नावाखाली खुलेआम जुगार सुरू असल्याची ही चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांकडून या क्लब वर कायदेशीर बाबींचा पर्याय पुढे करत दुर्लक्ष झाल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे छुप्या पद्धतीने सुरू असलेला मटका व सीसीटीव्हीच्या देखरेखा खाली पडदा लावून सुरू केलेला क्लब यामुळे अवैध धंदे पुन्हा एकदा जोर धरू लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच कणकवली तालुक्यात काही भागांमध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला असून गोव्यावरून आणली जात असलेली अवैध दारू विक्रीमुळे अनेक ठिकाणी वादांचे प्रसंग घडत आहेत. हे दारू अड्डे उध्वस्त करण्याकरता पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र लागोपाठ आलेल्या आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रोत्सवाच्या बंदोबस्ता मुळे पोलीस हे कारण देत सध्या याकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र अवैध धंद्यांवर कारवाई करताना सातत्य ठेवले नसल्याने अवैध धंद्यांची पाळीमुळे पुन्हा एकदा पसरू लागली आहेत. त्यामुळे छुप्या पद्धतीने सुरू असलेला मटका, या मटक्याला पर्याय म्हणून तयार झालेला गेल्या काही वर्षांपासून व आता तेजीत असलेला सोशल क्लब व गावागावांमधून होणारी अवैध गोवा बनवटीची दारू विक्री याप्रकरणी पोलिस आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.