हजारो हात एकवटले रामेश्वर श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीच्या तयारीत

इनामदार श्री देव रामेश्वरची स्वारी श्रींच्या हुकूमाने ३९वर्षानी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळास शाहीभेटीसाठी महाशिवरात्र दिनी पारंपरिक वाटेने प्रस्तान करणार आहे.यासाठी वाटा साफसफाई, डागडुजी करण्यासाठी आचरा ग्रामस्थांसोबत त्या त्या भागातील गावातील ग्रामस्थही सहकार्यास पुढे आले आहेत.कुणकेश्वर भेटीच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो हात एकवटले आहेत.यादृष्टीनेच आचरा नदिवरही स्वारी जाण्याच्या वाटेवर तराफा उभारण्याची लगबग सुरू झाली आहे.
येत्या २६फेब्रूवारीला महाशिवरात्री दिवशीसकाळी रामेश्वर मंदिर येथून इनामदार श्री देव रामेश्वर देव तरंगांची स्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळ शाहीभेटीसाठी राजेशाही सरंजामासह ढोल ताशांच्या गजरात निघणार आहे.पुर्वांपार प्रथेप्रमाणे श्रींची स्वारी पारंपरिक वाटेने जाणार आहे.३९वर्षांनी हा भेटीचा सोहळा बघण्याची अनुभूती अनुभवण्यास आचरावासियांसोबत संपूर्ण जिल्ह्यावासिय उत्सुक असल्याचे जाणवत आहेत.यामुळेच श्रींच्या स्वारी जाणारया वाटेच्या साफसफाई करण्यासाठी गेले आठ दहा दिवस संपूर्ण आचरावासियांसोबत पोयरे मश्वी,हिंदळे,कातवन आदी भागातील ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता राबत आहेत.कुणकेश्वर भेटीचा मार्ग आचरा पारवाडी खाडीतूनही जात असल्याने प्रस्थानाच्या वेळी भरतीचा विचार करून आचरा पारवाडी ग्रामस्थांकडून तराफा उभारण्याचे काम शुक्रवार पासून सुरू करण्यात आले आहे.कातवन येथेही श्रींच्या स्वारी जाण्याच्या वाटेवर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी झटून वाळूच्या पिशव्या भरून सेतू उभारला आहे.