असरोंडी मुख्य रस्ता ( कणकवली- कासरलमार्गे असरोंडी-मालवण) नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत
प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
मालवण : तालुक्यातील असरोंडी येथील कणकवली कासरल- असरोंडीमार्गे मालवण जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून देखील या रस्त्याची दखल अद्याप कोणीही घेतलेली दिसत नाही. मागील वर्षी पावसाळ्यात ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते व त्यातूनच शाळकरी मुले व वाहनचालक यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम देखील स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले होते. परंतु, पावसाळा उलटून पुढील पावसाळा जवळ आला तरी या एक वर्षात शासनाला रस्त्याचे मजबुतीकर करता आले नसल्याने असरोंडी ग्रामस्थ अत्यंत संतप्त असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी रस्त्याची अवस्था अजून खराब झाली असून पावसाळ्यापूर्वी जर हा रस्ता पूर्ण झाला नाही तर मुलांना शाळेत पाठवायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. हा रस्ता मालवणला जाणारा मुख्य रस्ता असल्याने वाहनाची कायम वर्दळ या रस्त्यावर असते. परंतु, प्रचंड प्रमाणात खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहनचालक सुद्धा त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. वारंवार रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत पाठपुरावा करून देखील रस्त्याचे काम होणार नसेल तर भविष्यात होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कोणी घेणार आसा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम पूर्ण न झाल्यास याच रस्त्यावर भर पावसात आंदोलन करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, मालवण