कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील विक्रेत्यांवर येणार उपासमारीची वेळ

उद्यापासून होणार स्टॉल हटाव मोहीम
पोलिसांचा असणार कडेकोट बंदोबस्त
महामार्ग प्राधिकरण ला अचानक जाग कशी काय आली?
कणकवलीत उड्डाण पुलाखालील अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही महामार्ग प्राधिकरणकडून शुक्रवार 17 मार्चपासून केली जाणार असून दोन दिवस ही मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरणने कणकवली पोलिसांकडे बंदोबस्त मागितला असून या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी कणकवली पोलिसांनी रंगीत तालिम केली. या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे खरोेखरच उड्डाण पुलाखालील भाग मोकळा श्वास घेणार का? की मोहिम फार्सच ठरणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र उड्डाणपुणाखाली लावलेले स्टॉल भाजी, फळ, फुलांची दुकाने हटवल्याने या सर्वच दुकानदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. एकीकडे महामार्ग प्राधिकरण कडून ही दुकाने लावेपर्यंत डोळे मिटून गप्प बसने पसंत केले होते. मात्र आता गेल्या कोविडच्या दोन वर्षाच्या काळानंतर नागरिकांनी उद्योग व्यवसायात पाय रोवायला सुरुवात केलेली असताना या दुकान व्यावसायिकांवर आता कुऱ्हाड कोसळणार आहे.
कणकवलीत महामार्ग चौपदीकरणांतर्गत उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. मात्र कणकवलीतील मुख्य चौक असलेल्या पटवर्धन चौकपासून दोन्ही बाजूने फळे, फुले, भाजीची दुकाने तसेच छोटे-छोटे स्टॉल पुलाखाली लावण्यात आले आहेत. तसेच अस्ताव्यस्त पार्किंगही ठिकठिकाणी पुलाखाली केले जाते. मुळात महामार्ग प्राधिकरणच्या नियमानूसार उड्डाणपुलाखाली कोणतेही दुकान, स्टॉल लावता येत नाही तसेच पार्किंगही करता येत नाही. मात्र कणकवलीत मुळातच पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने बर्याचशा गाड्या या पुलाखालीच पार्क केल्या जातात. यात दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनेही असतात. त्याचबरोबर पुलाखाली हॉटेल मंजुनाथपासून श्रीधर नाईक चौकापर्यंत अनेक स्टॉल, दुकाने पुलाखाली लावण्यात आली आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यातही बाधा येते शिवाय रस्ते सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. उड्डाणपुलाखाली बर्याच ठिकाणी बॅरिगेट्स काढून पार्किंगसाठी गाड्या लावण्यात आल्या आहेत. हे सर्व अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही आता महामार्ग प्राधिकरणच करणार आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून ही अतिक्रमण हटाव मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी दोन पोलिस अधिकारी, नऊ अंमलदार आणि दंगा काबू पथक बंदोबस्तासाठी असणार आहे. महामार्ग प्राधिकरणने संबंधितांना नोटीसा बजावून अतिक्रमण स्वतःहून हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आता शुक्रवारपासून पोलिस बंदोबस्तात ही मोहिम राबविणार आहे.
कणकवली प्रतिनिधी