कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिलपासून “दांडी किनाऱ्यावर”

२४ मार्च रोजी धुरीवाडा येथे बैठकीला उपस्थित राहण्याचे परशुराम उपरकर यांचे आवाहन
अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग आयोजित कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत चार दिवसांसाठी मालवण येथील “दांडी किनाऱ्यावर” आयोजित करण्यात येत आहे. गाबीत महोत्सवाच्या निमित्ताने गाबीत समाज बांधवांची महत्त्वाची बैठक 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता संस्कार हॉल ,धुरीवाडा मालवण येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ अध्यक्ष परशुराम उपरकर व गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी दिली.
गावित महोत्सव नियोजनासाठी कणकवली येथील भवानी हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यानंतर पत्रकारांशी बोलताना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर म्हणाले. गाबीत समाज मुख्यत्वे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजराथ या राज्यात विशेषतः किनारपट्टी भागात आढळून येतो. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई ते सिंधुदुर्ग या ठिकाणी गावीत वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे.छ. शिवरायांच्या काळात गाबीत समाजातील लोक आरमारामध्ये रक्षण करण्यासाठी तसेच गलबते चालविण्याचे काम करीत असत. शिवकालीन कार्यकाळ संपल्यानंतर या समाजाने उदरनिर्वाहासाठी किनारपट्टीभागात वास्तव्य करुन मच्छिमारी व्यवसाय सुरु केला. अशा इतिहास असलेल्या गाबीत समाजाला एका छत्राखाली एकाच व्यासपीठावर एकत्र करुन गावीत महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. यामध्ये अखिल भारतीय गाबीत समाज सिंधुदुर्ग महासंघाच्या नेतृत्वाखाली गाबीत समाज सिंधुदुर्ग व गाबीत समाज मालवण तालुका शाखेच्या यजमान पदाखाली गाबीत महोत्सवाचे नियोजन केले आहे. यामध्ये गाबीत समाजातील लहान थोर सर्व घटकांनी सहभागी होऊन हा महोत्सव यशस्वी करण्याचे ठरविले आहे.या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातून व राज्याबाहेरुन गाबीत समाज बांधव व पर्यटक असे मिळून सुमारे दीड ते दोन लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे.गाबीत महोत्सवामध्ये सर्वांना विविध मत्स्य पदार्थांची रेलचेल, तसेच मालवणी पारंपारिक खाद्य पदार्थ तसेच पारंपारिक मच्छिमारांची प्रात्यक्षिके, रोजगार प्रशिक्षण, पर्यटन परिसंवाद, पाककला स्पर्धा, सागरी सुंदरी स्पर्धा, नौकानयन, पोहोण्याची स्पर्धा, व क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत.समाजातील थोर व्यक्तींसाठी “गाबीत समाज भूषण” पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी होणारा आर्थिक खर्च हा गाबीत समजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, समाजबांधव व संस्था व आश्रयदाते यांच्या माध्यमातून गोळा करुन करण्यात येईल. राजकीय पादत्राणे बाजूला ठेवत हा महोत्सव साजरा करण्यात येणार असून 24 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीला गावी समाजातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, आजी माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य, संस्था प्रतिनिधी, नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन परशूराम उपरकर व चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.
कणकवली / प्रतिनिधी