अपघात प्रकरणी मेहुल धुमाळे निर्दोष

संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

बेदरकारपणे बुलेट गाडी चालवत स्पलेंडर मोटारसायकला मागून धडक देत दोघांच्या गंभीर जखमी होण्यास व मोटारसायकलच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून मेहुल उत्तम धुमाळे रा. कलमठ याची सह प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि. २८ जानेवारी २०२१ रोजी फैजान मुराद खोत व मित्र सलमान इसाक शेख हे दाघे मद्यपान करत वरवडे हेळ्याचा माळ येथे रस्त्यालगत बसले होते. त्यांनी कलमठ येथील सकलेन साजीद शहा या मित्राला चायनिज घेऊन येण्यास सांगितले. तो बराचवेळ न आल्याने फैजान व सलमान हे स्पेंडर गाडी घेऊन कणकवलीकडे येत होते. आयडीयल शाळेच्या जवळपास आले असता मागून आलेल्या एका वाहनाने दोघांनाही धडक दिली व ते वाहन न थांबता निघून गेले. त्यानंतर पडवे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी जखमींनी डॉक्टरांना दिलेल्या माहितीत स्वतःहून मोटारसायकल स्लीप होऊन पडल्याची माहिती दिली होती. पोलीस चौकशीत आरोपी याने आपल्या ताब्यातील बुलेट भरधाव वेगात चालवून मागून धडक देत अपघात केल्याचे व बुलेट घरी लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादवि कलम २७९. ३३७, ३३८, मोटार वाहन अधिनियम १८४ व १२३ नुसार गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवला होता. सुनावणीत सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, हॉस्पिटलमधील जबाब, तपासातील त्रुटी यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!