कणकवलीत तबलावादक वसंतराव आचरेकर यांचा ४३ वा स्मृतिदिन साजरा
स्मृतिदिनी पुणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक चारुदत्त फडके यांच्या उपस्थितीत तबलावादनाचे प्रशिक्षण वर्ग सुरु
येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली येथे १२ मार्च रोजी तबलावादक वसंतराव आचरेकर यांचा ४३ व स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक वसंतराव आचरेकर हे मूळचे आचरा या गावंचे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचे स्मरण म्हणून कणकवली येथील संवेदनशील सृजनशील ग्रामस्थांनी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यामार्फत महाराष्ट्रातील एक प्रचंड मोठी सांस्कृतिक चळवळ येथे उभी राहिली.
नाट्य, साहित्य, कला अशा अनेक सांस्कृतिक उपक्रमांसोबतच संगीत क्षेत्रामध्येही गेले अनेक वर्ष अभिनव उपक्रम राबवण्यात संस्था यशस्वी झाली. त्यामध्ये पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राच्या माध्यमातून गेले १६ वर्ष अविरत शास्त्रोक्त गायनाचे शिक्षण गुरु पंडित डॉ. समीर दुबळे यांच्याकडून विद्यार्थ्यांना लाभत आहे. कला अभ्यासकांना अभिजात संगीताची मूलभूत शिक्षणाची सोय संस्थेत आहे. त्याचबरोबर आता तबला वादनाचे प्रशिक्षण वर्गही आज तबलावादक आचरेकर यांच्या स्मृतिदिनी सुरु झाले आहेत. तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांचे शिष्य श्री. चारुदत्त फडके हे पुण्याहून कणकवलीमध्ये तबला प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेमध्ये दर महिन्याला येणार आहेत.
चांगले तबलावादक साधक निर्माण करणे हीच एका ऋषितुल्य तबलावादकास खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. एन.आर. देसाई यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, तबलावादक श्री. चारुदत्त फडके, सघन गान केंद्रातील गायक शिष्यवर्ग व नव्याने सुरु झालेल्या तबला प्रशिक्षण वर्गातील नवे शिष्य उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी