‘ बायोमेट्रिक ‘चे आदेश न मानणा-या ग्रामसेवकांवर कारवाई करा

🛑सामाजिक कार्यकर्त्यांचे दोडामार्गमध्ये उपोषण

🛑कोकण नाऊ l News Channel
✅प्रतिनिधी l दोडामार्ग
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली व हालचाल रजिस्टर ठेवण्याचा शासन आदेश असूनही ते अद्याप ठेवण्यात आलेले नाही.त्यामुळे शासनाचे आदेश न मानणा-या संबधित कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव (घोटगे ) व जेनिफर लोबो (साटेली भेडशी ) यांनी बुधवारी (ता. २) सकाळी दहा वाजल्यापासून येथील पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
कार्यालयाच्या दारात उपोषण सुरु असूनही कुणीही अधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी दुपारपर्यंत आला नव्हता. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वी लेखी पत्र देऊनही पंचायत समितीकडून त्यांना उपोषणसुरु होईपर्यंत कुठलेही उत्तर देण्यात आले नव्हते. उपोषणकरते दीपक जाधव आणि जेनिफर लोबो यांनी त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
शासनाच्या दि.०५ जानेवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणेबाबत निर्देश दिले आहेत. मात्र त्यांनी शासनस्तरावरील आदेश धुडकावून जनतेला मेटाकुटीस आणले आहेत. बांधकाम कामगारांची तर मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रास देत आहेत. अशा ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा आणि शासन आदेश धुडकावण्या प्रयत्न होत असल्याने बुधवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पंचायत समिती दोडामार्ग येथे सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी यांनी गट विकास अधिकारी अजिंक्य सावंत यांची भेट घेऊन कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यावेळी सावंत यांनी आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपोषणाबाबत कळवले आहे. त्यांच्या पत्राची वाट पाहत आहे असे धुरी यांना सांगितले.त्यांनी तसें उपोषणकर्त्यांना सांगितल्यावर आठ दिवसांपूर्वी निवेदन देऊनही अद्याप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

सीईओंना काय कळते?
तालुक्यातील एका ग्रामसेवकाशी यासंदर्भात दीपक जाधव यांनी चर्चा केली असता संबंधित ग्रामसेवकाने सीईओंना काय कळते असे उत्तर दिले. यावेळी जाधव यांनी त्यांना तुमचे बोलणे रेकॉर्ड होत आहे असे सांगताच संभाषण थांबवले आणि पुन्हा फोन घेतला नाही अशी माहिती जाधव यांनी दिली. तर साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल चांद यांनी काही ग्रामसेवक अरेरावी करतात, एकाधिकारशाहीने वागतात, कुणाला जुमानत नाहीत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असा मुद्दा मांडला.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या

@प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात तत्काळ बायोमेट्रिक थंब मशीन बसवून कर्मचारी हजेरी नुसारच पगार अदा करण्यात यावा.
@प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात हालचाल रजिस्टर ठेवण्यास बंधनकारक करावे.
@ ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांची दिशाभूल करून त्यांना त्रास देणे थांबवावे.
@जे ग्रामसेवक शासन आदेश मानत नाहीत त्यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी.

गटविकास अधिकाऱ्यांचे साचेबद्ध उत्तर

बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे, हालचाल रजिस्टर ठेवण्यात आले आहे,बांधकाम कामगारांना सहकार्य करावे असे पत्र ग्रामसेवकांना दिले आहे व ते शासन नियमानुसार काम करत आहेत अशी साचेबद्ध उत्तरे त्यांना दिलेल्या पत्रात दिल्याची माहिती दीपक जाधव यांनी देऊन आपण या पत्राने समाधानी नसून हा ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे असे सांगितले.

error: Content is protected !!