कणकवली रेल्वे स्टेशन रोडवरील स्कल्पचर चे 2 ऑक्टोबर रोजी आमदार नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली शहराच्या सौंदर्य करणात दिवसेंदिवस भर पडत असतानाच आता कणकवली रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या नरडवे रोड च्या सुशोभीकरणात देखील आता भर पडली आहे. कणकवली नगरपंचायत मध्ये सत्ता काळात आमदार नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यातून प्रस्तावित केलेले स्कल्पचर बसविण्याचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा 2 ऑक्टोबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. नागरी स्थानिक संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सुविधा पुरवण्यासाठी असलेल्या योजनेतून हे स्कल्पचर बसविण्याचे काम करण्यात आले आहे. कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन सुशोभीकरण तसेच गणपती साना येथील ब्रिज, गणपती सान्यावरील धबधबा या कामांसोबतच कणकवली रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या या नव्या थीम मुळे या परिसराच्या सुशोभीकरणात भर पडली आहे. विविध प्रकारची योगासने, याचबरोबर माझी वसुंधरा, सेव्ह द चाइल्ड, सेव्ह द अर्थ, डॉक्टर, स्वच्छतेचा संदेश अशा प्रकारची स्कल्पचर तयार करण्यात आली आहेत. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासह मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शहरवासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!