“बेसिक” व “युवा” या मुद्द्यावरून एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

दोडामार्ग पासून ते कणकवली पर्यंत पक्षातील गटबाजी समोर आल्याने चर्चा

काही महिन्यांपूर्वी व्हाट्सअप ग्रुप वर देखील विधानसभा उमेदवारीवरून प्रश्नचिन्ह

कणकवली तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आज झालेली खडा जंगी आज दिवसभरात कणकवली विधानसभा क्षेत्रात चर्चेचा विषय बनली होती. त्या पक्षाच्या आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे पूर्वीच बेसिक व युवा यांच्यामध्ये मतभेद झाल्याचे समजते. यामुळे एका विषयावरून करण्यात येणारे आंदोलन जाहीर करण्याकरीता आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करण्याची वेळ यावेळी आली. यात बेसिकच्या एका तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याने युवा च्या गेल्या काही दिवसांच्या वाटचालीवर व आंदोलनाचा मुद्दा धरून आक्षेप घेत मुद्दे उपस्थित केले. मदत बेसिक ची मग श्रेय युवा ला का? असा देखील सवाल झाल्याचे समजते. तर युवा पदाधिकाऱ्यांनी देखील या आक्षेपाला तेथेच जागीच उत्तर दिले. यावेळी काहीसा आवाज पण वाढलेला होता. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी काही वेळ या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी देखील झाली. यावेळी तू – तू मै – मै मुळे त्या पक्षाच्या दोडामार्ग पासून सुरू झालेल्या गटबाजी ची पाळेमुळे कणकवली विधानसभे पर्यत येऊन पोचल्याचे दिसून आले आहे. दरम्यान आज या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली गटबाजी ही येत्या विधानसभा निवडणुकीतही कणकवली मतदार संघामध्ये पक्षातील “सु” “शांत” पणा मोडित काढण्यासाठी काम करणारं असल्याचे आजचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्या पक्षातील अन्य काही जण विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांच्याकडून देखील चाचपणी चा “संदेश” या निमित्ताने दिला आहे. त्यातच भविष्यात होऊ घातलेल्या एका माजी लोकप्रतिनिधीचा प्रवेश यावरून पक्षात मतभेद असल्याचे बोलले जात आहे. व त्याचे पडसाद गेल्या महिन्यापासूनच पक्षांतर्गत उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या एका व्हाट्सअप ग्रुप वर देखील एका महिला पदाधिकाऱ्याने उपस्थित केलेला प्रश्न चर्चेत आला होता. त्यामुळे बेसिक आणि युवांमध्ये झालेली खडाजंगी ही येत्या काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या निश्चितपणे पथ्यावर पडणार आहे व त्याची रजबजणी गेल्या महिन्याभरापासूनच या पक्षात सुरू झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकी अगोदर या पक्षाला जिल्ह्यात लागलेले गटबाजीचे सुरुंग आता कुठे पर्यंत पोहचणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!