फळपीक विम्यासाठी ठाकरे गटाचे पुन्हा आंदोलन
आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली छेडणार आंदोलन
ठाकरे सेनेचे नेते सतीश सावंत यांची माहिती
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता सिंधुदुर्ग जिल्हयातील ४२१९० आंबा काजू बागायतदार शेतक-यांनी फळपिक विमा योजनेत सहभाग घेवून १९९११.०० हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांचा १५ मे २०२४ रोजी विमा कालावधी संपला आहे. नियमानुसार ४५ दिवसांत अर्थात १ जुलै २०२४ रोजी शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देणे क्रमप्राप्त होते. मात्र दिड महिना झाला तरी अद्यापही शेतकऱ्यांना फळ पिक विमा नुकसानीची रक्कम देण्यात आली नाही. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे फार मोठ्या प्रमाणात फळ पिकांचे नुकसान झाले आहे.
तरी विमा संरक्षण घेतलेल्या आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना दि २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत पिक विमा नुकसानीची रक्कम न मिळाल्यास २९ ऑगस्ट २०२४ रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना नेते सतीश सावंत यांनी जिल्हा कृषी अधीक्षक याना दिला आहे.