कुडाळ-मालवणमधून वैभव नाईक यांचा पत्ता कट !
भाजप पदाधिकारी दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांचे टीकास्त्र
कुडाळ, प्रतिनिधी
पुन्हा एकदा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची स्वप्न बघणाऱ्या वैभव नाईक यांच्याकडील जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय पडते यांच्याकडे सोपववत वैभव नाईक यांचा पत्ता कट केला आहे, अशी टीका भाजप पदाधिकारी दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
त्यामुळे वैभव नाईक यांना आता उमेदवारी मिळणार नाही अशी अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विशेषत: लोकसभा निवडणुकीत उबाठाचे विनायक राऊत यांच्या पराभवानंतर वैभव नाईक यांना त्यांच्याच पक्षाने चौफेर कोंडीत पकडले आहे. त्याच पराभवाचे वचपा काढत उबाठाच्या पक्ष नेतृत्वाने वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेत संजय पडते यांच्याकडे दिल्याने वैभव नाईक समर्थकांची चांगले धाबे दणाणले आहेत, अशीही टिका
दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक आणि विकासात्मक कामांमध्ये ढवळाढवळ न करता वैभव नाईक यांनी आपल्या अस्तित्वाची काळजी करावी, असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी दिला आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यांच्या यंदा देखील माजी खासदार आणि कुडाळ-मालवणचे निवडणूक प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी दहीहंडीचा मोठा उत्सव कुडाळ एसटी डेपो मैदान येथे साजरा करणार आहेत. मात्र, वैभव नाईक यांची नतद्रष्ट प्रवृत्ती पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. त्यांनी हा दहीहंडी उत्सव होऊ नये यासाठी एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना सदरचे मैदान भारतीय जनता पार्टीला देऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजले आहे. जनतेच्या विकास कामांची चाड नसलेल्या वैभव नाईक यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आता जनतेच्या मनोरंजनाची आणि आपल्या संस्कृतीच्या ठेवा जपण्याची देखील गरज नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे यानंतर वैभव नाईक यांनी कुडाळ-मालवणमध्ये ढवळाढवळ न करता वैभव नाईक यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई टिकवण्यासाठी इतरत्र जागा शोधावी, असा देखील टोला दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी लगावला आहे.