भाजपा नगरसेविका सुंदरी निकम यांचे सदस्यत्व अबाधित

ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवाराने दाखल केलेला अपात्रता अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला

सुंदरी निकम यांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

वैभववाडी नगरपंचायतीच्या विद्यमान भाजपाच्या नगरसेविका सुंदरी रामचंद्र निकम यांच्या विरुद्ध उबाठवा पक्षाचे पराभूत उमेदवार दिपक सदाशिव गजोबार यांनी दाखल केलेला सदस्य अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी फटाळला आहे. श्रीमती निकम यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

सन २०२१-२२ च्या वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणूकीत गोपळनगर प्रभागातून भाजपाच्या सुंदरी निकम व उबाठाचे दिपक गजोबार यांनी निवडणूक लढविली होती. त्यामध्ये श्रीमती निकम या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अनर्हतता अधिनियमांतर्गत वैभववाडी येथील सुंदरी निकम यांचा इमला क्र. ६४१ याबाबत उबाठाचे कार्यकर्ते स्वप्नील संतोष रावराणे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. त्यात सदर इमल्याचे अनधिकृत बांधकाम झाले असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अश मागणी करण्यात आली होते. तसेच निवडणूकीदरम्यान सदर इमल्याबाबत नामनिर्देशन पत्रामध्ये खोडसाळ माहिती देऊन सदरचा इमला नगरपंचायत दप्तरी सुंदराबाई रामचंद्र निकम यांच्या नावे असताना त्याची कागदपत्रे जोडून त्या दोन्ही व्यक्ती एकच असल्याबाबत कोणताही पुरावा न दिल्याने त्यांची निवडणूक रद्द करावी, अशीही मागणी केलेली होती. सुनावणीत सदरचा इमला हा पुरातन इमला असल्याने तो नगरपंचायत अस्तित्वात येण्याअगोदरपासून उभा असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय नगरसेविकेच्या कार्यकाळात त्याचे बांधकाम झाल्याबाबतचा पुरावा पुढे आला नाही. तसेच नामनिर्देशन पत्राबाबत निवडणूक अर्ज मुदतीत दाखल केलेला नाही. त्यामुळे सर्व आक्षेप फेटाळून सदस्यत्व अबाधित ठेवण्याचा निर्देश देण्यात आला.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!