अल्पवयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्या चुलत भावाला न्यायालयीन कोठडी

पोलिसांकडून संशयित आरोपीकडे कसून तपास

परराज्यातून कामासाठी कणकवली तालुक्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या सख्ख्या चुलत भावानेच बलात्कार केल्याने ती युवती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी त्या संशयित युवकाला कोल्हापूर येथून अटक केल्यानंतर त्याची दोन दिवसाची पोलीस कोठडी आज संपली त्याला आज बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांच्यासह तपासात त्यांना मदत करण्यासाठी पोलीस हवालदार सुप्रिया भागवत व पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ हे सुद्धा सहकार्य करत आहेत. कणकवली तालुक्यातील एका क्रशरवर पीडित युवती आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होती. ती युवती आपल्या कुटुंबीया सहीत गावी गेली असताना तिच्या वारंवार पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूर येथील एका रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. या तपासणी दरम्यान सदर पीडित युवती ही सहा महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यामुळे याप्रकरणी सदर युवतीने दिलेल्या माहितीनुसार पोक्सो कायद्यान्वये संशयीत आरोपी विरोधात कोल्हापूर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. व सदर गुन्हा शून्य नंबरने कणकवली पोलिसांकडे अधिक तपासासाठी वर्ग करण्यात आला. ही घटना जानेवारी ते जून 2024 या कालावधीमध्ये घडली. दरम्यान या युवतीने सुरुवातीला आपण कामावर राहत असलेल्या ठिकाणी एक युवक येऊन सातत्याने अत्याचार करत होता अशी माहिती पोलिसांना दिली. मात्र तिच्याकडून संशयित आरोपीचे नाव व अन्य माहिती बाबत अपुरी माहिती मिळत असल्याने पोलीस तपासात अडचण निर्माण होत होती. दरम्यानच्या काळात कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढें यांनी आपल्याकडून तपासाची चक्रे गतीने फिरवत तपास सुरू केला. खरी माहिती समोर आली तर बदनामी होईल या भीतीने त्या युवती व तिच्या कुटुंबीयांकडून संदिग्ध माहिती दिली जात असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. या प्रकाराने पोलीस देखील चक्रावून गेले होते. दरम्यान पोलिसांना या प्रकरणी संशय वाटल्याने तपासी अधिकारी राजकुमार मुंढें व त्यांच्या टीमने खोलात जाऊन अधिक माहिती घेतली असता त्या पीडित युवतीच्या वडिल व कुटुंबियांकडे कसून तपास केला असता त्या पीडित युवतीच्या चुलत भावानेच तिच्यावर सातत्याने बलात्कार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर श्री मुंडे व सोबत असलेल्या पथकाने संशयित आरोपीला तात्काळ कोल्हापूर येथे तो राहत असलेल्या ठिकाणाहून अटक केली. दरम्यान संशयित आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती ती संपल्याने आज संशयीत आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घनशाम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!