कंत्राटदाराने नाल्यात पाण्यासाठी खणलेल्या खड्ड्यामुळेवायंगणी पाटवाडी पुल खचला

पुलाच्या दुरुस्तीच्या लेखी आश्वासनावर झाली तडजोड

आचरा : वायंगणी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम करणारया कंत्राटदाराने पाण्यासाठी पाटवाडी नाल्यात जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून तडे गेले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कंत्राटदार आणि ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना धारेवर धरत पुलाचे काम करून देण्याची मागणी करत कंत्राटदारासह अभियंत्यांना रस्त्यावरच रोखून धरले होते. शेवटी सदर पुलाच्या दुरुस्ती व बांधकामाच्या लेखी आश्वासनानंतरच या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला.

वायंगणी गावात सुरु असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामासाठी मे डि आर कन्स्ट्रक्शन कंत्राटदाराच्या कामगारांनी कुणालाही न विचारता पाटवाडी येथील पुलालगतचार मार्च रोजी नाल्यात खड्डा खणल्यामुळे पुलाला धोका निर्माण होऊन पुल खचल्याचे ग्रामस्थांना दिसून आले होते.याबाबत येथील ग्रामस्थ उमेश सावंत, रावजी सावंत, ग्रा प सदस्य मालती जोशी, दत्तात्रय सावंत, संजय सावंत, गणेश धुळे, विलास सावंत आदी ग्रामस्थांनी सोमवारी साईट इंजिनिअर स्वप्नील पवार, कनिष्ठ अभियंता गणेश बागायतकर यांना घटना स्थळी बोलावून धोकादायक बनलेल्या पुलाचे बांधकाम करुन देण्याची मागणी केली होती. याबाबत कनिष्ठ अभियंता बागायतकर यांनी कंत्राटदाराच्या निष्काळजी पणामुळे ही घटना घडल्याने त्याची जबाबदारी असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली तर कंत्राटदार संपूर्ण दुरुस्तीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करु लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांना रस्त्यावरच अडकवून ठेवत जोपर्यंत बांधकामाची लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत हलणार नसल्याचा पवित्रा घेतला.आचरा पोलीस स्टेशनला ही फोन करुन येथील ग्रामस्थ उमेश सावंत, पोलीस पाटील त्रिंबककर यांनी घटनेची माहिती देत तक्रार देण्याची तयारी दर्शविली होती.दोन अडीज तास चाललेल्या या वादानंतर झोनल अभियंते लक्ष्मण सुर्वे यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. शेवटी कंत्राटदारासह वायंगणी ग्रामपंचायत कार्यालयात जात लेखी आश्वासन लिहून घेतल्यावरच या प्रकरणावर पडदा पडला.या नुसार पाटवाडी ते भंडारवाडी या ग्रामसडकेवर कंत्राटदाराच्या निष्काळजी पणामुळे पाटवाडी पुलाचा भाग खचलेला आढळून आला. याबाबत अधिक पहाणी केल्यावर चार मार्च रोजी मे डि आर कन्स्ट्रक्शन यांनी जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केल्यामुळे नुकसान झालेले आहे असे दिसून आले. याबाबत संबंधितांना तात्काळ बोलावून घेण्यात आले.त्यावेळी झोनल इंजिनिअर लक्ष्मण सुर्वे,साईट इंजिनिअर स्वप्नील पवार, कनिष्ठ अभियंता गणेश बागायतकर उपस्थित होते. ग्रामस्थांनी खचलेल्या भागाची दुरुस्ती व बांधकाम करुन देण्याची मागणी केली. सदर मागणी मध्ये खचलेल्या भागात आवश्यक तेथे काँक्रीट, चिरयाचे बांधकाम व सुमारे दिड फुटाचा भराव करुन डांबरीकरण करुन देण्याचे तसेच वाहत्या पाण्याचा मार्ग मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली. यानुसार सदर मागणी कंत्राटदाराकडून पुर्ण करुन देण्याचे मान्य केल्यानुसार पंचनामा केला गेला. यावर संबंधित अभियंत्यांसोबत उपस्थित ग्रामस्थ तसेच वायंगणी उपसरपंच समृद्धी असोलकर यांच्या सह्या आहेत.

आचरा / अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!