कुडाळ येथून चोरीला गेलेली बुलेट मोटरसायकल अखेर गडहिंग्लज येथून ताब्यात

ज्ञानेश्वर हेमंत जाधव वय २२ रा. गडहिग्लज कोल्हापूर व ओमकार दिनकर गायकवाड गडहिंग्लज कोल्हापूर या दोघांना अटक
कुडाळ शहरातील शिवाजी पार्क येथून चोरीला गेलेली बुलेट मोटरसायकल अखेर गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर हेमंत जाधव वय २२ रा. गडहिग्लज कोल्हापूर व ओमकार दिनकर गायकवाड गडहिंग्लज कोल्हापूर या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी या दोघांनाही कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कुडाळ शहरातील शिवाजी पार्क येथे राहणारे कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस अनिल लवू पाटील यांच्या मालकीची बुलेट मोटरसायकल 12 जून रोजी रात्री चोरीला गेली होती. याप्रकरणी पाटील यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीबाबत कुडाळ पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग हे संयुक्तपणे तपास करत होते. या तपासादरम्यान कुडाळ बस स्थानकासमोरील एका हॉटेलमधील सीसीटीव्ही यंत्रणा पोलिसांनी तपासली. यावेळी या टेम्पोतून उतरून एक इसम शिवाजी पार्कच्या दिशेने चालत जाताना दिसला. पोलिसांनी या टेम्पो मालकाचा शोध घेत त्याच्याकडे तपास केला. यावेळी लॉ कॉलेजचा एक विद्यार्थ्यांला आपण त्या ठिकाणी आणून सोडल्याचे या टेम्पो मालकाने सांगितल्याने पोलिसांनी तसा तपास सुरू करत या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. यावेळी संबंधित विद्यार्थी हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील असल्याचे समजले. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व कुडाळ पोलीस यांनी गडहिंग्लज येथे जाऊन गुरुवारी रात्री मोटरसायकल सह दोघांना ताब्यात घेतले. यामध्ये ज्ञानेश्वर हेमंत जाधव हा लॉ कॉलेजचा विद्यार्थी असून त्या सोबत असलेल्या ओमकार दिनकर गायकवाड यालाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी या दोघांना कुडाळ न्यायालयात हजर केले . याप्रकरणी पोलिसांना अधिक तपास करता यावा यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे या दोन्ही संशयित आरोपी साठी चार दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित संशयित युवकांनी या मोटर सायकलची डुप्लिकेट चावी तयार केली होती. तसेच ही बुलेट मोटरसायकल चोरीतील आहे हे कोणाला समजू नये यासाठी डुप्लिकेट नंबर प्लेटही तयार करून ती मोटरसायकल गडहिंग्लज येथे नेऊन वापरत होते अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. या चोरी प्रकरणांमध्ये पुढे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमलदार सचिन गवस, बस्त्याव भुतेलो, अनिल पाटील, प्रीतम कदम, कृष्णा केसरकर तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनी मेहनत घेतली अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.