मनही रिचार्ज करणार,”अंबुद” उत्सव रंगणार!

पल्लवी फाऊंडेशन आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पल्लवी फाऊंडेशन आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदापासून मनही रिचार्ज करणारा “अंबुद” उत्सव आयोजित करण्यात आला आहे. १३,१४,२७ आणि २८ जुलै रोजी मुंबईच्या कुर्ला येथील प्रबोधन प्रयोगघर येथे चहा आणि गरमागरम कांदा भजीचा आस्वाद घेत हा उत्सव रंगणार आहे.
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, एनएसडीचे माजी संचालक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांच्या हस्ते शनिवार १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता या उत्सवाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर यांचे “हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी ठसा” या विषयावर ७० एमएम व्याख्यान होणार असून पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांच्या मुलाखतीने होणार आहे. वृषाली विनायक बागवे यांच्याशी संवाद साधतील.
रविवार १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आळवेकर यांची खास मुलाखत होणार आहे. रिया या सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यांच्या संघर्ष कहाणीचा उलगडा करतील वृषाली विनायक.
शनिवार २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता चंद्रशीला आर्ट्स या संस्थेचा “खलिफा” हा बहुचर्चित सांगीतिक अभिवाचन प्रयोग सादर होणार असून दिग्दर्शक आहेत सचिन शिर्के.
“अंबुद”चा समारोप रविवार २८ जुलै रोजी होणार असून कवी प्रसाद कुलकर्णी
“आनंद यात्रा” सादर करतील. त्यानंतर ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांचे मनच नाही, तर मेंदुही रिचार्ज करणारे व्याख्यान होणार असून त्यांना विषयाचे बंधन नाही, पण विषयांतरही होणार नाही अशी ग्वाही महाराव यांनी दिली आहे. सायंकाळी ५ वाजता हा समारोप सोहळा सुरू होईल.
मन रिचार्ज करायला सर्व रसिकांनी या “अंबुद” उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक शलाका कोरगावकर आणि रजनी राणे यांनी केले आहे. सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!