कणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉपी आगीत भस्मसात
लाखो रुपयांचे नुकसान, मोबाईल सहीत असेसरीज देखील जळून कोळसा
“एप्रिल फुल” असण्याच्या शक्यतेने सुरुवातीला अनेकांचे दुर्लक्ष, तोपर्यंत दुकानाची राख रांगोळी
कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपी च्या दुकानाला आज सकाळी लागलेल्या आगीत पूर्णता दुकान जळून खाक झाले. आज सोमवारी सकाळी सात वाजता आग लागल्याचे निदर्शनास आले. दुकानातून धूर येऊ लागल्यानंतर काहींनी आसपासच्या गाळेधारकांना फोन केले. सुरुवातीला एप्रिल फुल असेल या शक्यतेने आलेल्या फोनकडे दुर्लक्ष केले. राजस्थान येथील व्यापारी असलेल्या या दुकान मालकाला देखील फोन करण्यात आले. मात्र तो येईपर्यंत मात्र काही वेळातच अक्षरशा दुकानाची राख रांगोळी झाली. त्यात दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान आगीची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायत चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र तो पर्यत दुकानाच्या आतील भाग पूर्णतः आगीने वेढून गेला होता. त्यानंतर मोबाईल दुकानाचे शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घटनेची माहिती मिळतात कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर, संदीप नलावडे, प्रसाद अंधारी, संतोष पुजारे, दत्ता शंकरदास, अण्णा कोदे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्यात सहभाग घेतला. नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
दिगंबर वालावलकर/ कणकवली