सिंधुदुर्ग महाविद्यालयात कायदेविषयक अभ्यासक्रमाचा समारोप

मालवण – स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘महिलांविषयक कायदे’ या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचा समारोप दिनांक 18 मार्च रोजी नरहरी प्रभुझांट्ये सभागृहात संपन्न झाला.
कायद्याचा आपल्याला वेळोवेळी वापर करावा लागतो, त्यामुळे तो समजून घेणे गरजेचे आहे. तसेच जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला, मात्र बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतात महिलांना लगेच मतदानाचा अधिकार मिळाला, त्यामुळे संविधान देखील समजून घेणे आवश्यक आहे, असे मत प्रमुख पाहुणे, बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी मांडले. या अभ्यासक्रमातील मार्गदर्शक या नात्याने मनोगत व्यक्त करताना, ॲड. प्राची कुलकर्णी यांनी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर महत्वाच्या बाबींचे शिक्षण देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात, त्यामुळे महाविद्यालयाचा गुणवत्ता स्तर उंचावलेला आहे आणि विद्यार्थ्यानी त्याचा उपयोग करून घ्यावा, असे आपल्या भाषणात सांगितले. ॲड. प्राजक्ता गावकर यांनी आम्हाला विद्यार्थ्यांशी या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने संवाद साधण्याची संधी मिळाली, आणि विद्यार्थ्यानी चांगला प्रतिसाद दिला, असे आपल्या मनोगतात मांडले.
या प्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तसेच यातील गुणवान विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे: प्रथम क्रमांक महेक शेख, द्वितीय क्रमांक विभागून आश्लेषा ठाकूर, पूर्वा कीर्तने, काजल वाघ
तृतीय क्रमांक विभागून निकिता शर्मा, मेगल डिसुझा, दिक्षिता जोशी, हर्षाली कांदळगावकर, भाग्यश्री मालंडकर , भार्वी शिर्सेकर
या कार्यक्रमात अभ्यासक्रमात व्याख्याने देणाऱ्या सर्व मार्गदर्शक महिला वकिलांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथी ॲड. देवदत्त परुळेकर आणि श्री. शैलेश खांडाळेकर यांचा शाल , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी हा अभ्यासक्रम राबविण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगणने केलेल्या सर्वतोपरी सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आणि सर्व सहभागी आणि गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमादरम्यान महिला विकास कक्ष समन्वयक डॉ सुमेधा नाईक यांनी हा अभ्यासक्रम महाविद्यालयाने दरवर्षी राबवावा, असे आवाहन केले. महिला विकास कक्षाच्या वतीने, अभ्यासक्रम समन्वयक डॉ. उज्वला सामंत यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या समारोप समारंभाचे स्वागत, प्रास्ताविक डॉ सुमेधा नाईक यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन अभ्यासक्रम समन्वयक डॉ उज्वला सामंत यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर ॲड. प्राजक्ता गावकर, ॲड. सोनल पालव, ॲड. काजल झाड, ॲड. प्राची कुलकर्णी, ॲड. पूजा शेडगे, ॲड. उर्मिला आचरेकर, ॲड. मानसी चव्हाण, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी शुभम सकपाळ, इत्यादी उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ उर्मिला मेस्त्री, प्रा रश्मी राऊळ, प्रा. नमिता राणे, मेगल डिसुझा, श्रेया अटक यांनी परिश्रम घेतले.