काजू शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठीच खरेदी केंद्राची उभारणी

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांचे प्रतिपादन

बाजार समितीमार्फत कणकवली शहरात काजू बी खरेदी केंद्र सुरू

काजू बी खरेदी विक्रीच्या हंगामात बाजार समितीचा कुठलाही परवाना न घेता शेतमाल खरेदी विक्री अनधिकृत व्यवहार होत असतील तर त्यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. अशा अनधिकृत खरेदी-विक्री व्यवहारामुळे खरेदीदार व शेतकरी यांच्यात वजनमापेबद्दल किंवा किमतीबद्दल वाद निर्माण होतात. त्यामुळे बाजारपेठेत काजू बी खरेदी-विक्री करण्याकरीता हंगामापुरता/तात्पुरत्या कालावधीकरीता उपबाजार केल्याने खरेदी विक्री करणे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सोईचे होईल, असे प्रतिपादनकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनी केले.
सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कणकवली शहरात तात्पुरता हंगामी उपबाजार काजू बी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा शुभारंभ मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या समितीचे संचालक प्रदीप मांजरेकर, कर्मचारी प्रकाश दळवी, व्यापारी विजय कोदे, श्री. काणेकर, श्री. बोर्डवेकर, शेतकरी संदीप कदम, मोहन गावकर, प्रियल घाडी, स्वप्नील रावराणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी श्री. रावराणे म्हणाले, या माध्यमातून काजू बी शेतकऱ्यांच्या काजू बी ला चांगला दर मिळावा यासाठी हा प्रयत्न आहे. तसेच सध्या काजू बीला गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील काजू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी शासनाकडे मागणी करत आहेत. त्यांना समितीच्या मार्फत पाठिंबा असून काजू बी ला शासनाकडून चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!