नाटळ लघुपाटबंधारे धरणाला प्रशासकीय मंजुरी

आमदार नितेश राणे यांची शब्दपूर्ती
संदेश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार नितेश राणे यांनी नाटळ वासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला असून नाटळ राजेवाडी लघुधरणाला प्रशासकीय मान्यता मिळवून आणली आहे. बहुप्रतिक्षित 250 हेक्टर जलसिंचन क्षमता असलेल्या नाटळ राजेवाडी लघुपाटबंधारे धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या धरण प्रकल्पासाठी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत तसेच संजना सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. धरण प्रकल्पासाठी 60 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. स्थानीक ग्रामस्थांची नाटळ राजेवाडी येथे मृद जलसंधारण खात्यामार्फ़त लघुधरण बांधण्यात यावे अशी वर्षानुवर्ष मागणी होती. मात्र आजवर शाब्दिक आश्वासनापलीकडे काहीच होत नव्हते. गावपुरुष बबन सावंत, नाटळ सरपंच सुनील घाडीगांवकर, उपसरपंच तायशेट्ये यांनी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत यांच्या माध्यमातून आमदार नितेश राणेंकडे लघुधरण बांधण्याची मागणी केली होती.हे धरण झाल्यामुळे नाटळ गावात सुमारे 101 ते 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत होणार असल्याने तातडीने हा प्रकल्प मंजूर व्हावा अशी मागणी केली होती. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी लवकरात लवकर हे धरण मंजूर करण्याचा शब्द दिला होता. 4 मार्च रोजी या धरण प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून आमदार नितेश राणे यांनी देऊ तो शब्द पूर्ण करू याची प्रचिती दिली आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण