खारेपाटण येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत वारंवार नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ग्राहक त्रस्त….

नेटवर्क सुविधा त्वरित सुरू न केल्यास आंदोलन छेडणार -रमाकांत राऊत
खारेपाटण या गावातील शिवाजीपेठ अर्थात खारेपाटण बाजारपेठेत राष्ट्रीयकृत: असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत गेले सलग तीन महिने वारंवार नेटवर्क नसणे या जटील समस्येने येथील ग्राहक तथा बँक खातेदार हैराण झाले असून गेली चार दिवस तर सलग नेटवर्क नसल्याने ग्राहक तसेच व्यापारी या वर्गाची मोठी तारांबळ उडाली आहे.दरम्यान खारेपाटण बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील या नेटवर्क समस्येबाबत त्वरित उपाय काढून सेवा सुरळीत न केल्यास स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी वर्गाच्या वतीने बँकेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी बँक व्यवस्थापनाला दिला आहे.
याबाबत अधिक वृत असे की, खारेपाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्र ही शाखा जिल्ह्यातील सर्वात जुनी शाखा असून खारेपाटण दशक्रोशी तील व आजूबाजूचे सुमारे ४० ते ५० गाव या बँकेवर अवलंबून असून या बँकेचे ते खातेदार आहेत.सर्वात जास्त मुंबई महानगर पालिका अर्थात म्युंसीपालटी मधून सेवानिवृत्त झालेले खेड्यापाड्यातील पेन्शन घेणारे व्यक्ती या बँकेत सर्वाधिक सभासद आहेत.आपल्याला पेन्शन मिळेल या आशेने सलग चकरा मारणाऱ्या या जेष्ठ नागरिक महिला तसेच व्यापारी वर्ग नोकरदार याना केवळ नेटवर्क नसल्यामुळे आवश्यक असलेले पैसे मिळू शकले नाहीत. यामुळे एकंदरीत बँकेच्या या ढील्या कारभाराबाबत ग्रामस्थामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तर खेड्यापाड्यातील लोकांना बँकेत येताना पैसे न मिळाल्यामुळे शारिरीक,मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.आपल्या खात्यातील.पैसे आपल्याला मिळतील या आशेने तासनतास बँकेच्या आवारात उभे तर कधी बसून राहणारे ग्रामीण भागातील पेंशनर वृध्द नागरिक याना या नेटवर्क समस्येचा जास्त त्रास सहण करावा लागत आहे.त्यामुळे बँकेच्या बाहेर व आत मध्ये नागरिकांची तथा बँक खातेपुस्तक दात्यांची मोठी गर्दी या आठवड्यात पाहायला मिळत होती.
खारेपाटण महाराष्ट्र बँकेत नेटवर्क नसल्याचे पार्श्वभूमीवर आज खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत तसेच खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्राजल कुबल,सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र खारेपाटण शाखेला भेट देत येथील शाखा व्यवस्थापकशी चर्चा केली. बँकेच्या गोवा रिजनल ऑफिसर याना देखील याबाबत कळविण्यात आले असून वारंवार नेटवर्क का जात आहे.याचे कारण अजून समजू शकले नाही.मात्र तांत्रिक व यांत्रिक कर्मचारी याचा शोध घेत आहे.लवकरच नेटवर्क समस्या दूर होईल असे बँक व्यवस्थपणाकडून सांगण्यात आले.
मात्र या दोन दिवसात नेटवर्क यांत्रना सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी बँकेला दिला आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण