कणकवली महाविद्यालयात रानफुले छायाचित्र प्रदर्शन व झाडांच्या कवितांचे वाचन

कणकवली/मयुर ठाकूर

शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग, वाड़मय मंडळ आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ फेब्रुवारी व दि.२७ फेब्रुवारी या दोन दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
त्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच दि.२६ फेब्रुवारीला ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, कलावंत श्री. वामन उर्फ उदय पंडीत यांच्या रानफूल छायाचित्रांचे प्रदर्शन व झाडांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी मंचावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन, डॉ.राजश्री साळुंखे, कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री.युवराज महालिंगे, मान.अशोक करंबेळकर व मा.श्री.वामन पंडीत उपस्थित होते.
डॉ.राजश्री साळुंखे यांनी ” युवा पिढीने ज्ञान आणि विज्ञान यांची कास धरत असतानाच पर्यावरणाची जोपासनाही केली पाहिजे. झाडं आपल्याशी संवाद साधतात. तो समजण्यासाठी त्यांच्या सानिध्यात राहिले पाहिजे. झाडे वाढवली पाहिजेत, जगवली पाहिजेत” असे प्रतिपादन केले.
प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतांना ” या उपक्रमामागचा विचार आणि त्याची उपयुक्तता जाणुन घेतल्यास संवेदनशील पीढी निर्माण होऊ शकते आणि त्यातूनच निसर्ग आणि पर्यावरणाविषयी अधिक जागरुकता निर्माण होऊ शकते आणि म्हणुन हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय उपयोगी आहे” असे नमूद केले.
श्री.अशोक करंबेळकर यांनी ” हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून असे उपक्रम उपक्रम फक्त एक दिवस करुन चालणार नाही, ते सातत्याने चालू राहिले पाहिजेत. झाडांविषयीची संवेदनशीलता आणि जागरुकता निर्माण होण्यासाठी असे उपक्रम एखादा वसा हाती घेतल्याप्रमाणे राबविले गेले पाहिजेत “असे सांगितले.
श्री. वामनर पंडीत यांनी झाडांवरच्या कवितांचे अभिवाचन या प्रसंगी केले. त्यांनी अगदी व्यासांपासून सुरूवात करून आधुनिक काळातील कवींच्या कवितांमध्ये सुध्दा झाडांविषयीचे प्रेम आणि संवेदनशीलता कशी व्यक्त होते हे दर्शविणाऱ्या निवडक कविता सादर केल्या. त्यात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास, मंगेश पाडगांवकर, विं.दा.करंदीकर, ग.दि.माडगुळकर, गुलझार, बा.भ.बोरकर तसेच जिल्हयातील वीर धवल परब आणि अजय कांडर अशा नामवंत कवींच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचा शेवट वा. ना. टिळक यांच्या “रानफूल” या कवितेच्या अभिवाचनाने झाला. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांनी रानफूल छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.बी.जी. गावडे यांनी केले.

error: Content is protected !!