कणकवली महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

विविध कथांचे करण्यात आले अभिवाचन
कणकवली कॉलेज कणकवली येथे मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग आणि आचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विचार मंचावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन तथा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.राजश्री साळुंखे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य युवराज महालिंगे, प्रमुख अतिथी मा.वामन पंडित, प्रा. सीमा हडकर, प्रा. विनिता ढोके उपस्थित होते.
यावेळी डॉ.राजश्री साळुंखे मॅडम यांनी माय मराठीचा गौरव करायला हवे असे प्रतिपादन करून मराठी भाषेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी मराठी भाषा दर्जेदार असून मराठीतील साहित्यिकांच्या दर्जेदार कथांचे अभिवाचन करण्याची गरज असल्याचे सांगितले व मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मा.वामन पंडित यांनी मराठीतील दर्जेदार साहित्यिकांच्या साहित्याचा परिचय करून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठी विभागातर्फे ‘कथारंग’ हा साहित्यिक कथाकार,नाटककार विद्याधर पुंडलिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कथा अभिवाचनाचा कार्यक्रम करण्यात आला. यात ‘भेट ‘ या जी.ए.कुलकर्णी यांच्या कथेचे अभिवाचन शिवानी वर्दम हीने केले . ‘ कांचनमृग ‘ या जी.ए. कुलकर्णी यांच्या कथेचे अभिवाचन कांचन परुळेकर हिने केले तर विद्याधर पुंडलिक यांची ‘आजी शरण येते’ ही कथा शुभम जाधव तर ‘ माळ’ ही कथेचे अभिवाचन मृणाल गावकर हिने केले .त्याशिवाय विभा हडकर, समीक्षा शिवलकर, सायली मुणगेकर, सलोनी सावंत, तनया कदम या विद्यार्थ्यांनी कवितांचे अभिवाचन केले तसेच प्रा.सीमा हडकर , प्रा. हरिभाऊ भिसे यांनी मालवणी कविता सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा हडकर, सूत्रसंचालन मृणाल गावकर व आभार प्रा. सीमा हडकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .
कणकवली प्रतिनिधी