कनेडी हायस्कूलची दिक्षा चव्हाण राज्यात प्रथम
कणकवली/मयुर ठाकूर
राष्ट्रीय कॅरमस्पर्धेत करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
कनेडी हायस्कूलचा कॅरम मधील दबदबा कायम
क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक २९ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा वसमत हिंगोली येथे संपन्न झाली. या स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी कु. दिक्षा नंदकिशोर चव्हाण (इ. १२वी विज्ञान) हिने उत्कृष्ट प्रदर्शन करत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. उप उपांत्य फेरीत दिक्षाने मुंबईच्या बलाढ्य मिताली महाडिक हिच्यावर २१-३, २१- ५ असा सनसनाटी विजय मिळवत एकचं खळबळ उडवून दिली. उपांत्य सामन्यात तिने कोल्हापूरच्या श्रावणी कोलगे हिचा २१-३, २१-७ असा धुव्वा उडवला. अंतिम फेरीत दिक्षाने पुण्याच्या प्रणाली मते हिचा ८/२१, २१/१४, २१/७ असा पराभव केला आणि सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये ती आता महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. सलग चार वर्षे नॅशनल सिलेक्शन होणारी, सलग दोन वर्षे नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त करणारी तसेच सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारी दिक्षा चव्हाण ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कॅरमपटू बनली आहे हे विशेष कौतुकास्पद आहे. गतवर्षी सुद्धा दिक्षा हिने राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.
क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबईचे विद्यमान संचालक सन्मा. श्री. सतीश सावंत व सर्व सन्माननीय पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी दिक्षाचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कु. दिक्षा हिला प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक आणि कॅरम प्रशिक्षक श्री. मकरंद आपटे, क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, जिल्ह्यातील ख्यातनाम कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव यांचे मार्गदर्शन लाभले.