कणकवली तालुका पत्रकार संघाचा रविवारी पुरस्कार वितरण सोहळा
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची प्रमुख उपस्थिती
कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे दिले जाणारे पत्रकार पुरस्कार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार या पुरस्कारांचा वितरण सोहळा व पत्रकार कुटुंब स्नेहसंमेलन सोहळा रविवार 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. ते सायं. 6 वा. वेळेत पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट गार्डन येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे उपस्थित राहणार आहेत.
कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे यावर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दिलीप हिंदळेकर यांना, शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार राजेश सरकारे यांना तर अनिल सावंत स्मृती ग्रामीण आदर्श पत्रकार पुरस्कार मिलिंद डोंगरे यांना जाहिर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर यशस्वी उद्योजक पुरस्कार उद्योजक मुदस्सर शिरगांवकर यांना आणि सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार पंढरी उर्फ पिंट्या जाधव यांना दिला जाणार आहे. तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचतगट समूहाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणार्या कलमठ येथील सौ. तन्वीर शिरगावकर यांचाही विशेष सन्मान पत्रकार संघातर्फे केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, सा.बां.चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार विजेत्यांना जिल्हाधिकारी व वरील मान्यवरांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. त्याचबरोबर पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनाही पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
तर सायंकाळच्या सत्रात पत्रकार कुटुंबियांचे स्नेहसंमेलन होणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळयाला सर्व पत्रकार व कुटुंबियांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे व कार्यकारिणी, सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी