दमदाटी करत मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कनेडी मधील नऊ जणांवर गुन्हा दाखल

गडग्याची चरी बुजविण्यासाठी केली दमदाटी
कनेडी- बाजारपेठ येथे एका घरालगत गडगा बांधण्याचे सुरू असलेले काम काही तरुणांनी अडवून धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. घडली. या बाबतची फिर्याद प्राजक्ता गुरुदास कारेकर (५२, रा.कनेडी बाजारपेठ) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयित अभिजीत उर्फ प्रफुल्ल नंदकुमार काणेकर (२४,रा. कनेडी बाजार), विनोद सावंत (६०,रा. नाटळ विजयवाडी), प्रदिप उर्फ बाली सावंत (५५,रा.सांगवे), सुरेश सावंत (६५,रा. सांगवे), संदिप पवार (३५,रा. कनेडी बाजारपेठ), मयुर महादेव पवार (२४,रा. कनेडी), दिलीप चव्हाण (५०,रा.कनेडी), रायमन घोन्साल्वीस (५५,रा.सांगवे), चंद्ररतन कांबळे (५०,रा. सांगवे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राजक्ता कारेकर व गुरुदास कारेकर यांनी घरालगत गडगा बांधण्यासाठी ११ जानेवारी रोजी ४ कामगार बोलवले होते. ते कामगार सकाळी ९ वा.च्या सुमारास गडगा बांधण्यासाठी चरी खणून चीरे लावत होते. B ३०,३५ चि-यांचे बांधकाम झाल्यानंतर १५ते २० माणसांचा घोळका आम्ही काम करत असलेल्या ठिकाणी आला. त्यामध्ये अभिजीत काणेकर, विनोद सावंत, प्रदिप सावंत, सुरेश सावंत, संदिप पवार, मयुर पवार, दिलीप चव्हाण, रायमन घोन्साल्वीस, चंद्ररतन कांबळे यांचा समावेश होता. त्या सर्वांनी बांधकाम करत असलेल्या ठिकाणी येवून बेकायदेशीर जमाव करुन कामावर असलेल्या कामगारांना दमदाटी केली.तसेच त्यांना तेथून जाण्यास सांगितले. याबाबत प्राजक्ता कारेकर व त्यांच्या पतीने त्यांना जाब विचारला असता त्यांनी काम थांबवून चरी बुजवून टाकण्यास सांगितले. त्यावेळी प्राजक्ता कारेकर यांनी माझे गडग्याचे बांधकाम करु द्या असे सांगितले असता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्यापैकी विनोद सावंत व अभिजीत काणेकर यांनी प्राजक्ता व गुरुदास कारेकर यांना शिवीगाळी करुन, जी चरी तुम्ही मारली आहे ती बुजवून टाका नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील अशा स्वरुपाची धमकी दिली. त्यानंतर ते सर्व तिथून निघून गेले.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
कणकवली प्रतिनिधी