कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे – अजित पवार

मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते – प्रफुल पटेल

येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतल्याने जबाबदारी वाढली आहे; उडान तय करेगी आसमान किसका है – छगन भुजबळ

मुंबईत लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व दाखवेल – समीर भुजबळ

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्याला षण्मुखानंद सभागृहात प्रचंड प्रतिसाद…

मुंबई – कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला.

मुंबईमध्ये पक्ष ज्यापध्दतीने वाढायला हवा होता. तशाप्रकारचा पोचला नाही. आमचं लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल असेही अजितदादा पवार म्हणाले.

आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा. ज्याला पद देत आहात किंवा देणार आहात त्यांची प्रतिमा त्याच्या विभागात चांगली आहे का याचाही विचार करा असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

आठवडयातील एक दिवस आपल्या आमदारांना वेळ द्यायला सांगेन. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे आज दिसले. शिवसेना फक्त मुंबईत होती त्यानंतर ती कोकणात पोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु. मला सांग सकाळी मुंबईतील वेगवेगळ्या भागात येतो. लोकहिताच्या कामांची पाहणी करतो. या मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला.

धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. काहीजण आज करतो उद्या करतो सांगत असतात अरे काय देवळातील घंटा आहे का ती असा टोलाही अजितदादा पवार यांनी लगावला.

महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहेत. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी असेही मत अजितदादा पवार यांनी मांडले.

अल्पसंख्याक, ओबीसी, मागासवर्गीय या समाजांना निधीची कमतरता भासू दिली नाही. आपण वंचित व बहुजनांकरता काम करत आहोत हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी सांगितले.

चांद्यापासून बांद्यापर्यंत जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील असा प्रयत्न करायचा आहे. हे राज्य माझे आहे, सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला काम करताना देत आहे असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

समीरभाऊंच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत उभी राहिल. एक एक पायरी म्हणजे कार्यकर्ता असतो. तो नेत्याला जोडणारा दुवा असतो. सर्व जाती धर्माच्या लोकांचा आपण आदर करतो. सर्व सणांमध्ये सहभागी होतो. हे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे आले पाहिजे. सत्तेकरता आम्ही सत्तेत गेलो नाही. सर्व सामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता निर्णय घेतला. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही अजितदादा पवार यांनी विरोधकांना केला.

स्वतः ची प्रसिद्धी करण्यासाठी मी काम करत नाही किंवा सोशल मिडियावर पोस्ट करत नाही. पहाटे उठून लोकांची कामे कशी होतील असा माझा प्रयत्न असतो असेही काहींचे नाव घेता टोला अजितदादा पवार यांनी लगावला.

मुंबईत २४ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस वाढली नाही त्याच्या कितीतरी पटीने समीरभाऊच्या नेतृत्वाखाली वाढेल त्यासाठी सरकारची ताकद उभी करु. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला.

error: Content is protected !!