डिगस-राणेवाडी शाळेतला शिक्षक चार वर्षे शिक्षण विभागाच्या दावणीला !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार
शिक्षकाची गरज मुलांना कि प्रशासनाला ?
मनसेच्या प्रसाद गावडे यांचा सवाल
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात मंजूर पदांपैकी जवळपास 30 टक्के शिक्षकांची पदे रिक्त असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने शिक्षकाला मुलांचं शैक्षणिक नुकसान करून दावणीला बांधल्याची बाब उघड झाली आहे. एकीकडे जिल्ह्यातील शाळांमध्ये आजमितीस शिक्षकांची आवश्यकता असताना दुसरीकडे कुडाळ तालुक्यातील डिगस राणेवाडी शाळेतील उपशिक्षक दर्जाच्या शिक्षकाला कार्यालयात प्रतिनियुक्ती देण्यामागे शिक्षण विभागाची आर्थिक गणितं असल्याचा आरोप मनसेच्या प्रसाद गावडे यांनी केला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक एसी केबिनच्या बाहेर पडून विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हानी पाहणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला आहे.
दर आठ दहा दिवसांनी वेगवेगळ्या शिक्षकाला प्रति नियुक्ती कामगिरी देऊन कामचलाऊ पद्धतीने वेळ मारून नेण्यामागे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यामागे प्राथमिक शिक्षण विभागाची नेमकी कोणती गैरसोय आहे ? शिक्षकांच्या बदल्या व भरत्यांमधील आर्थिक गणितं सोडवण्याचे काम तर संबंधित शिक्षकाला दिलं गेलं नाही ना याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या शिक्षण मंत्र्यांनी व पालकमंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभाराची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीद्वारे केली असून उद्या होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.