दिव्यांग दिनानिमित्त गोपुरी आश्रमात दिव्यांगांचा स्नेहमेळावा संपन्न
कणकवली : दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, या योजनांचा लाभ मिळवून देण्यात शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे दिव्यांगांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन आपली ताकद शासन व प्रशासनाला दाखवली पाहिजे, असे आवाहन एकता दिव्यांग विकास संस्था कणकवलीचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एकता दिव्यांग विकास संस्था व गोपुरी आश्रमच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रमात दिव्यांगांचा स्नेहमेळाव्याप्रसंगी श्री. सावंत बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, डॉ. धनंजय रासम, एकता दिव्यांग विकास संस्थेचे सचिव सचिन सादिये, उपाध्यक्ष संजय वारंगे, ग्रामसेविका संगीता पाटील, गोपुरी आश्रमचे सचिव विनायक मेस्त्री, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, अशोक करंबेळकर, पत्रकार महेश सरनाईक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, कोरगावकर ट्रस्टच्या ट्रस्टी सुचित्रा कोरगावकर, तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, विनायक सापळे, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, आर. के. पाटील, विलास गुडेकर, दीपक दळवी यांच्यासह एकता दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
डॉ. धनंजय रासम म्हणाले, कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आरोग्य सेवा देण्यात आपण सदैव तयार आहे. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजेंद्र मुंबरकर, अशोक करंबेळकर, विनोद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले. मेळाव्यास दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी एकता दिव्यांग संघ, गोपुरी आश्रम पदाधिकारी व सदस्यांसह कणकवली कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.