स्थानिक घटकावर संशोधन होणे गरजेचे

  • विजयकुमार वळंजू

कणकवली महाविद्यालयात १८ वी संशोधन प्रकल्प स्पर्धा संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर

कोकणातील काजू, आंबे, कोकम यावर संशोधन करून उत्पन्न वाढवता येते.आविष्कार संशोधन स्पर्धेतून सामाजिक विकास साध्य व्हावा.आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक घटकावर संशोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विजयकुमार वळंजू यांनी केले.
कणकवली कॉलेज, कणकवली आणि विद्यार्थी विकास मंडळ मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयात दिनाक २ डिसेंबर २०२३ रोजी १८ वी आविष्कार संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धा एचपीसीएल सभागृहामध्ये संपन्न झाली.
या आविष्कार विभागाच्या जिल्हास्तरीय संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित होते.
या वेळी मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.सुनील पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू, आविष्कार विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर शिरसाट सह समन्वयक डॉ. उमेश पवार, कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे ,मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.सोमनाथ कदम, महाविद्यालयातील आविष्कार विभागाच्या समन्वयक नूतन घाडीगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.सुनिल पाटील यांनी संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
” ज्या संशोधनामध्ये नाविण्यता असते ते संशोधन अधिक श्रेष्ठ असते.केवळ राष्ट्रीय पातळीचाच विचार न करता आपल्या आजूबाजूचे सामाजिक प्रश्न संशोधनातून मांडता येतात. जे संशोधन समाजाभिमुख असते तेच श्रेष्ठ असते. संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडविले जावेत
” असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी केले.
या संशोधन प्रकल्प स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील प्रमुख १० महाविद्यालयातील ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा हडकर यांनी केले. प्रास्तविक डॉ.श्यामराव दिसले यांनी केले.व शेवटी आभार प्रदर्शन प्रा. डॉ. बी . एल.राठोड यांनी केले.

error: Content is protected !!