निलंबित वनपाल सत्यवान सुतार यांना जिल्ह्याबाहेर मुख्यालय द्या

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची मागणी

उपवनसंरक्षक सावंतवाडी यांचे शासन निर्णयाकडे वेधले लक्ष

कणकवली – बोगस पास प्रकरणी निलंबित झालेले भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांना निलंबन कालावधीत दिलेले दोडामार्ग मुख्यालय बदलून तात्काळ जिल्ह्याबाहेर देण्यात यावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे केली आहे. वनपाल दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर कार्यरत वनविभागाच्या बाहेर अर्थात दुसऱ्या वनविभागात कार्यकारी पदावर मुख्यालय देणे क्रमप्राप्त आहे. असा शासन निर्णय असल्याच्या गोष्टीकडे विवेक ताम्हणकर यांनी उपवनसंरक्षक यांचे लक्ष वेधले आहे.
उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण आपल्या अधिकार क्षेत्रातील श्री. सत्यवान अनंत सुतार वनपाल भिरखंडे यांच्या कार्यपद्धती विरुद्ध व बोगस पास प्रकरणी चौकशी करून त्यांना निलंबित केले याबद्दल आपले अभिनंदन व आभार.
आपल्या दिनांक २७/१०/२०२३ रोजीच्या आदेशानुसार श्री. सत्यवान अनंत सुतार यांना निलंबित केल्यानंतर त्यांना निलंबन कालावधीमध्ये त्यांचे मुख्यालय दोडामार्ग दिल्याचे दिसुन येते आहे.
महाशय विविध शासन निर्णयाचा अभ्यास केला असता वनपाल दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर कार्यरत वनविभागाच्या बाहेर अर्थात दुसऱ्या वनविभागात कार्यकारी पदावर मुख्यालय देणे क्रमप्राप्त आहे. परंतु आपण श्री. सत्यवान अनंत सुतार यांना त्यांचे मुख्यालय दोडामार्ग हे दिले आहे. परिणामी शासन निर्णयातील तरतुदींचा भंग व अवमान होत असल्याचे दिसुन येत आहे.
श्री. सत्यवान अनंत सुतार यांची कार्यपध्दती व बोगस मालकी कामे व बोगस पास विक्री प्रकरणी त्यांच्यावर आपण कारवाई केली असली तरी ते कार्यरत असलेल्याच वनविभागात म्हणजेच दोडामार्ग मुख्यालय दिले असल्याने ते सिंधुदुर्ग जिल्हयातच कार्यरत राहणार आहेत. ते याच जिल्हयात कार्यरत राहिल्यास आपल्याशी संबंधित असलेल्या विविध लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे नेते, लाकुड व्यापारी यांच्या मार्फत तकारी करून, दबाव टाकुन वनविभागातील कामकाजात हस्तक्षेप करू शकतात. तसेच स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रास देखील होवु शकतो.
तरी शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करून श्री. सत्यवान अनंत सुतार यांना त्यांचे मुख्यालय तात्काळ जिल्हयाबाहेर कार्यकारी पदावर देण्यात यावे ही विनंती. असे या पत्रात म्हटले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!