अखंड लोकमंच तर्फे राजा शिरगुप्पे यांना श्रद्धांजली

राजा शिरगुप्पे यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी हानी

अखंड लोक मंच कणकवली व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा कणकवलीच्या वतीने साहित्यिक राजा शिरगुप्पे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
राजा शिरगुप्ते यांचे नुकतेच कोल्हापूर येथे वयाच्या 64 व्या वर्षी नीधन झाले . कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी क्षेत्रांत आपली छाप उमटवणारे, साहित्यिक-कार्यकर्ते, कामगार चळवळ , समाजकारण ते साहित्यिक असा राजा शिरगुप्पे यांचा प्रवास राहिला असून त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. त्यांनी विविध सामाजिक चळवळीत काम केलं.गोरगरीब आणि श्रमिकांसाठी पुरोगामी दृष्टिकोनातून आणि कृतिशील भूमिका अंगीकारून ते आयुष्यभर झटले. मूळचे शिक्षक असले, तरी त्यांनी स्वत:ला चार भिंतींच्या वर्गात कधीच बंदिस्त केले नाही. पांढरपेशी प्राध्यापकीपणा न मिरवता समाजाच्या तळागाळातील जनतेशी स्वत:ला जोडले आणि त्यांच्यासाठी झगडले. त्यामुळेच त्यांची ओळख ही प्राध्यापक आणि साहित्यिक याच्या पलीकडे गेली. देवदासी प्रथा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन; तसेच तंबाखू कामगार, प्रकल्पग्रस्त अशा विविध चळवळींत ते सतत सक्रिय राहिले. त्यांनी कधीही आपल्या पदाचा, लेखनाचा किंवा कार्याचा बडेजाव मिरवला नाही; सदैव माणूसपणा जपला. समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे ते गाढे अभ्यासक होते. राजाभाऊंचा जन्म १९५९ मधील. निपाणी येथे देवचंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा विडी कामगार आंदोलनाशी संबंध आला. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, प्रा. सुभाष जोशी यांच्यासोबत त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

विद्यार्थीदशेत जुळलेला चळवळींशी ऋणानुबंध आयुष्यभर कायम राहिला. चळवळीच्या निमित्ताने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आला. त्यांनी महागाव, कोल्हापूर येथे अध्यापन केले. आजरा येथे ‘ज्ञानपीठ’ या सामाजिक संस्थेची स्थापना करून; तसेच गडहिंग्लज येथे ‘दिशा शिक्षण संस्था’ उभारून त्यांनी ग्रामीण विकासाशी नाळ जोडली. सांगलीत भरलेल्या विद्रोही सांस्कृतिक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कथा, कविता, समीक्षा आदी विविध साहित्यप्रकार हाताळताना ते कधीही आपल्या भूमिकेपासून ढळले नाहीत. भूमिका घेऊन जगले. ‘शोधयात्रा ईशान्य भारताची’, ‘न पेटलेले दिवे’ ही त्यांची प्रमुख पुस्तके. महात्मा बसवेश्वर यांच्यावर त्यांनी संशोधनात्मक पुस्तक लिहिले. कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीचा आधार बनलेल्या, संवेदनशील मनाच्या या तळमळीच्या कार्यकर्त्याचा व्रतस्थ वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कणकवली येथील स्वामी आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमांमध्ये अखंड लोकमंचचे अध्यक्ष -चित्रकार नामानंद मोडक, त्याचबरोबर विनायक सापळे, कवि राजेश कदम,जेष्ठ साहित्यिक मोहन कुंभार,अच्युत देसाई,कवि किशोर कदम,गोपी पवार,,कवयित्री सरिता पवार,कवयित्री कल्पना मलये, शैलाजा कदम,वंदना राणे, महेश काणेकर,आशिष नाईक, सुजय कदम, अमित भोगटे -आदी उपस्थित होते.
श्रद्धांजली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखंड लोक मंचचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले . यावेळी कल्पना मलये, गोपी पवार,मोहन कुंभार, सरिता पवार,वंदना राणे महेश काणेकर यांनी राजा शिरगुप्पे यांच्या एकूण कार्यावर मते व्यक्त केली .
सूत्रसंचालन व आभार राजेश कदम यांनी केले.
राजा शिरगुप्पे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अखंड लोक मंचच्या माध्यमातून भविष्यात कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!