शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांचा तडकाफडकी राजीनामा

पक्षांतंर्गत गळचेपी होत असल्याचा आरोप
आप्पा पराडकर यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात ठाकरे गटामध्ये खळबळ
शिवसेना ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख व माथाडी कामगार नेते आप्पा पराडकर यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाला अजून एक धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र श्री. पराडकर यांनी दिले असून या वृत्ताला त्यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला आहे. गेली दहा वर्ष पक्षामध्ये काम करत असताना गळचेपी होत असल्याचा आरोप श्री. पराडकर यांनी या राजीनामा पत्राद्वारे केला आहे. वारंवार याबाबत चे लक्ष वेधून देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराज होत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. हा कोंडमारा सहन होत असल्याने स्वाभिमानाने हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना पक्षामध्ये कार्यकर्ते टिकतील कसे त्याऐवजी गळती होण्याकडे जर लक्ष दिले जात असेल व हे पक्षाचे धोरण असेल तर त्यातून बाहेर पडणे योग्य असल्याचे म्हणत श्री. पराडकर हे यांनीही राजीनामा पत्र दिले आहे. नवी मुंबई संपर्कप्रमुख, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सह संपर्कप्रमुख व भारतीय कामगार सेनेच्या चिटणीस या सर्व पदांचा श्री. पराडकर यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान आप्पा पराडकर यांचा रोख नेमका कुणावर आहे? हे जरी स्पष्ट होत नसले तरी शिवसेना ठाकरे गटातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. येत्या काळात दुसऱ्या पक्षात जाणार नसल्याचे श्री. पराडकर यांनी स्पष्ट केले असले, तरी त्यांच्या या भूमिकेने मात्र शिवसेना ठाकरे गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे. खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून श्री. पराडकर यांची ओळख असताना नेमके कुठे बिनसले? त्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली