नारींग्रे हायस्कुलला लॅपटॉप भेट
नारिंग्रे येथील एस .बी .राणे हायस्कूल या प्रशालेला, प्रशालेचे माजी विद्यार्थी, श्रीमती डॉक्टर वैजयंती चौगुले/ पाटील ,कोल्हापूर आणि नारिंग्रे येथील बाळकृष्ण धर्माजी पाताडे यांनी संयुक्तपणे प्रशालेला लॅपटॉप भेट दिला आहे. शाळेचे मुख्याध्यापक ,सुधाकर मंडलेसर यांनी त्यांचे आभार मानले. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक चौगुले सर यांनी त्यांच्या काळामध्ये प्रशालेसाठी फार योगदान दिले होते. त्यांचे विद्यार्थी आजही त्यांची आठवण काढतात. त्यांची मुलगी डॉक्टर वैजयंती चौगुले /पाटील , आणि त्यांचे वर्गमित्र बाळकृष्ण पाताडे यांना शाळेसाठी काही करावे असे नेहमी वाटते आणि म्हणूनच त्यांनी याबाबत मुख्याध्यापक सुधाकर मंडलेसर यांच्याकडे विचारपूस केली असता, शाळेला लॅपटॉपची गरज आहे असे समजले आणि म्हणून या दोघांनी मिळून एकत्रित आर्थिक मदत करत शाळेला लॅपटॉप भेट दिला. या लॅपटॉप च्या मदतीने शाळेची बरीचशी कामे होणार असून या योगदानाबद्दल मुख्याध्यापक मंडले सर यांनी आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील शाळा चालवत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते शासनाकडून आदेश येत असतात .परंतु त्यांची पूर्तता करण्यासाठी पुरेसे आर्थिक बळ नसते. अशावेळी दात्यांच्या आधाराची गरज असते. माजी विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे शाळेला मदत करून समस्या सोडविल्याने मुलांच्या प्रगतीला हातभार लागला आहे. नारिंग्रे येथील प्रशाला गरीब, गरजू, विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असते. प्रशालेचे स्वतःचे वसतिगृह असून यामध्ये विविध जाती धर्माचे विद्यार्थी प्रवेश घेतात आणि त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, आणि संस्था मदत करत असतात .पूर्वी ओ.बी.सी आणि ओपन च्या विद्यार्थ्यांनाही शासनाकडून अनुदान मिळत होते परंतु अलीकडे ते बंद झाले आहे. त्यामुळे या कॅटेगरीतील मुलांना प्रवेश घेताना अडचणी येत आहेत .यासाठी शासनाने मदत करून पूर्वीप्रमाणे ओ.बी.सी आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी माजी विद्यार्थ्यांकडून होत आहे. जेणेकरून खऱ्या अर्थाने आर्थिक गरज असलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होईल. श्रीमती चौगुले /पाटील आणि पाताडे यांसारख्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन प्रशालेच्या विविध समस्या सोडवाव्यात असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक सुधाकर मंडले सर यांनी केले आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी, शिक्षक ,कर्मचारी, उपस्थित होते .सर्वांना गोड खाऊ वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
आचरा, अर्जुन बापर्डेकर