सासोली जमीन प्रकरणाच्या अपिलावर न्याय देण्यास विलंब

सहहिस्सेदारांचा आरोप: उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी उपोषण
उप विभागीय अधिकार्यांकडून सासोली जमीन प्रकरणाच्या पुनर्विलोकन अपिलावर न्याय देण्यास विलंब होत असल्याने सासोली ग्रामस्थांनी सोमवारी (ता.6) उप विभागीय अधिकारी कार्यालयाासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सासोली येथील काही सामाईक जमिनींना तहसीलदारांनी अनधिकृतपणे अकृषिक सनद दिली. त्यात काही चुका आढळल्याने उपविभागीय कार्यालयात पुनर्विलोकन अपिल दाखल असून वेगवेगळी कारणे देत या कामी विलंब केला जात आहे. वेगवेगळी कारणे देऊन तारखा दिल्या जात असल्याने सासोली ग्रामस्थांची पिळवणूक करण्याचे काम सुरू आहे. या विरोधात ६ नोव्हेंबरपासून सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महेश ठाकूर, संदेश भुजबळ, मनोज गवस, विजय ठाकूर, संतोष सावंत व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सासोली येथील वेगवेगळ्या सर्व्हे नंबर मधील सामाईक भागदार कब्जेदार, वहिवाटदार आहेत. या सर्व जमिनी ग्रामस्थांच्या सामाईक मालकी कब्जाभोग्याच्या मिळकती असून कुणाचेही हिस्से ठरवून धडेवाटप झालेले नाही. तरीही काही धनदांडग्यांनी या मिळकतींतील काही हिस्सा अविभाज्य हिस्सा म्हणून खरेदी केला आणि यावेळी ग्रामस्थांची कोणतीही संमती घेतली नाही. या धनदांडग्यांना तहसीलदार दोडामार्ग यांनी अनाधिकारे अकृषिक सनद दिली. या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले. यात काही प्राथमिकदृष्ट्या चुका आढळल्या. त्याबाबत येथील उपविभागीय कार्यालयात पुनर्विलोकन अपिल दाखल केले. मात्र, या कामी विलंब करण्याच्या उद्देशाने वेगवेगळी कारणे देऊन तारखा दिल्या जात आहेत.त्याला कंटाळून शेतकरी सह हिस्सेदारांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
प्रतिनिधी, दोडामार्ग