दीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे लोकार्पण
तालुकावासीयांचे हाल थांबण्याची अपेक्षा
तालुकावासीयांच्या सेवेसाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले. तालुक्यातील सर्व जनतेसाठी शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिकेचे शनिवारी (ता.4) येथील गांधी चौकात लोकार्पण केले. ही रुग्णवाहिका संपूर्ण तालुक्यातील रुग्णांसाठी २४ तास सेवा देणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिली. मंत्री केसरकर यांनी वेंगुर्ले,शिरोडा या ठिकाणीही रुग्णवाहिका दिल्या आहेत.त्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार मानले.
दुर्गम दोडामार्ग तालुक्यातील लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची मोठी उणीव भासत आहे. रुग्णवाहिकेअभावी अनेक रुग्णां ची गैरसोय होत होती. खासगी वाहनाने त्यांना रुग्णालयात जावे लागे.तालुक्याच्या ठिकाणी अनेक रुग्ण वाहिका असूनही अनेकदा त्या उपलब्ध नसायच्या त्यामुळे गरोदर महिला आणि अत्यवस्थ रुग्णांचे हाल व्हायचे.गणेशप्रसाद गवस व अन्य पदाधिकार्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्याने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या पक्षाच्या वतीने दोडामार्ग तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली . ही रुग्णवाहिका तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात राहणार आहे. रुग्णांसाठी ती २४ तास उपलब्ध आहे. रुग्णांना फक्त इंधन खर्च दयावा लागेल.नोंदणीसंदर्भातील कागदपत्रे पूर्ण करून येत्या आठ दिवसात रुग्णवाहिका सेवेत येणार आहे. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, राजेंद्र निंबाळकर, रामदास मेस्त्री, योगेश महाले, शैलेश दळवी, गोपाळ गवस, तिलकांचन गवस, संजय गवस, भगवान गवस, उदय मयेकर, मायकल लोबो, अनिल शेटकर, प्रवीण गवस, चेतना गडेकर, राधिका गडेकर,सविता नाईक व अन्य पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी, दोडामार्ग