कामावरून कमी करू नका !
डाटा ऑपरेटरांचे पालकमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातील यशस्वी अकॅडमी, पुणे या संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील संगणक ऑपरेटरना कामावरुन कमी करण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन यशस्वी डाटा एन्ट्री ऑपरेटरांच्या वतीने बुधवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले.
यावेळी ऐश्वर्या कदम, धनंजय पवार, दिनेश कसालकर, अपर्णा पवार, हरेश पवार, उज्वला जाधव, स्वरा लाड, ललित वालावलकर, आरोही धुरी, शुभम सावंत, अजय कांबळे, पूजा दळवी, नेत्रा खोत आदि जिल्ह्यातील ६२ यशस्वी अकॅडमीचे डाटा ऑपरेटर उपस्थित होते.
यशस्वी डाटा एन्ट्री ऑपरेटच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सर्व संगणक ऑपरेटर गेली दोन ते तीन वर्षे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे यशस्वी या संस्थेमार्फत प्रशिक्षणार्थी संगणक ऑपरेटर या पदावर सेवा देत आहोत. परंतु शासनाच्या प्रशिक्षणार्थी धोरणानुसार सदर ऑपरेटरना २ वर्षांचा प्रशिक्षणार्थी कालावधी पुर्ण झाल्याने २५ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्यमुक्त करण्यात येणार आहे..
सद्य स्थितीत आम्ही हे काम एक रोजगाराचे साधन म्हणून पहात असल्याने मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात / विद्यावेतनात घरखर्च सांभाळत आहोत अचानक आम्हावर बेरोजगारीचे संकट आल्याने आमचे एकमेव असलेले मिळकतीचे साधन हिरावले गेल्याने आम्हाला आर्थीक संकाटाला सामोरे जावे लागणार आहे. जरी हे प्रशिक्षण असले तरी या प्रशिक्षणातुन आहोत त्या ठिकाणी आम्हास कंत्राटी का होईना रोजगार उपलब्ध होईल अश्या आशेने आम्ही हे काम स्विकारले होते. परंतु आम्हाला कार्यमुक्त केल्याने आम्ही हवालदिल झालो आहोत.तरी आपण आम्हास आहोत त्या ठिकाणी कंत्राटी किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेमध्ये सामावुन घेऊन आमची होणारी उपासमार थांबवावी व होणाऱ्या अन्यायाबाबत न्याय मिळवुन दयावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तर यशस्वी अकॅडमीच्या अधीकार्यांशी बोलून या बाबत चर्चा करू व आपल्यासर्वाना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आपल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले असल्याचे यशस्वी डाटा एन्ट्री ऑपरेटच्या वतीने ऐश्वर्या कदम यांनी सांगितले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.