आयनल पावणाई मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करण्यास गंगाराम साटम गटाला जिल्हा न्यायालयाची परवानगी

कणकवली कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे आदेश जिल्हा न्यायालयाकडून स्थगित
पार्टी क्रमांक 1 तर्फे ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
कणकवली तालुक्यातील आयनल पावणाई मंदिर नवरात्र उत्सव साजरा करण्यावरून गंगाराम साटम व गजानन साटम यांच्यात गेली अनेक वर्ष वाद होते. याप्रकरणी न्यायालयीन दावे पार पाडले. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस निरीक्षक यांनी दोन्ही गटांना 144 चे जमावबंदी आदेश लागू करावे असा अहवाल कणकवली कार्यकारी दंडाधिकारी यांना सादर केला होता. त्या नुसार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्यासमोर 13 ऑक्टोबर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान पूर्वीचे 144 चे आदेश, न्यायालयीन निर्णय, पार्टी नं 1 यांचा मानपान व लोक भावना विचारात न घेता केवळ पोलीस अहवालावर विसंबून दोन्ही गटांना नवरात्रोत्सव साजरा करण्यास बंदी आदेश लावण्याचा निर्णय देण्यात आला. या दरम्यान पार्टी नं 1 मधील प्रवीण साटम यांनी आपण स्वतंत्र होत आपली वेगळी भूमिका मांडली. या प्रकरणी पार्टी नंबर 1 गंगाराम साटम यांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशानेने व्यथित होत जिल्हा न्यायालयात ऍड. उमेश सावंत यांच्या मार्फत पुनर्नरीक्षण याचिका दाखल केली. कार्यकारी दंडाधिकारी यांचा सदरचा बंदी आदेश अन्यायकारक असून, कायदेशीर प्रक्रिया न पाळता काढला गेला असल्याने नागरिकांना या आदेशा मुळे नाहक धार्मिक उत्सवा पासून वंचीत रहावे लागते. त्यामुळे ही बाब न्यायाशी सुसंगत नसल्याने तातडीने सदर आदेश स्थगित करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद ऍड.उमेश सावंत यांनी केला. त्यावर जिल्हा न्यायालयाने कागदपत्र, निवाडे यांचा परामर्ष घेत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कणकवली यांचा आदेश स्थगित करत पार्टी नंबर 1 गंगाराम साटम गटाला उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले. तसेच या उत्सवात अन्य गटांना ही सामील करून घ्यावे असे नमूद केले. त्यामुळे पाचव्या दिवसा पासून उत्सव साजरा करण्याचा मार्ग न्यायालयाच्या आदेशाने मोकळा झाला आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली