जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेचे घवघवीत यश.

सावंतवाडी प्रतिनिधि क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा व्यवस्थापन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत तळवडे येथील श्री जनता विद्यालयाने विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विविध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत पूजा तुकाराम सावंत हिने लांबउडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक तर १०० मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला तर रंजना प्रवीण परब हिने २०० मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. ४×१०० रिले स्पर्धेत पूजा तुकाराम सावंत, रंजना प्रवीण परब, तन्मयी संदेश पावणोजी, सुरेखा हरी केरकर, साक्षी संदीप पेडणेकर या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत महादेव सगुण चेंदवणकर याने ४०० मी . धावणे प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला .
वरील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची २१ ऑक्टोंबर २०२३ रोजी सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तथा पर्यवेक्षक दयानंद बांगर, क्रीडा विभाग प्रमुख विजय सोनवणे, क्रीडा शिक्षक शांताराम गवई, दिलराज गावडे, प्रवीण गोडकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!