गगनबावडा तळेरे रस्त्याची पाहणी करत काढणार पदयात्रा

शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती
जनतेला त्रास होणाऱ्या प्रश्नांवर यापुढे ठाकरे गट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार
मुंबई गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून गगनबावडा करूळ वैभववाडी तळेरे रस्त्याची पाहणी शिवसैनिक 30 ऑक्टोबर रोजी करणार असून शिवसेनेची पदयात्रा 30 ऑक्टोबर रोजी सकाळी सुरू होऊन तळेरे येथे सायंकाळी सांगता होणार असल्याचे शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी विजय भवन येथील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी संपर्कप्रमुख अतुल रावराने, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके उपस्थित होते. आमदार वैभव नाईक, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे विधानसभा प्रमुख सतीश सावंत महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख पदाधिकारी या पदयात्रेत सामील होणार आहेत.
गगनबावडा घाट रस्त्याच्या दुरवस्थे बाबत गणेशचतुर्थी पूर्वी शिवसेनेच्या वतीने तळेरे वैभववाडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले होते. त्यावेळी केवळ आश्वासने देण्यात आली. सध्या हा रस्ता वाहतूक योग्य नाही. 250 कोटी रुपयांचा अंदाजे खर्च रस्ते दुरुस्तीसाठी होता. भवानी कस्ट्रक्शन कंपनीने 40 टक्के कमी दराने टेंडर घेतले असून गणेशचतुर्थी काळात खड्डे सुद्धा बुजवले नाही. आजही खड्डे दुरुस्ती अथवा डांबरीकरण चे काम सुरू केले नाही. 30 ऑक्टोबर पूर्वी रस्ता मजबुतीकरण चे काम सुरू केले नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहोत. दिवाळी सण जवळ येत असून पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. ऊस वाहतूक, गौण खनिज वाहतूक करूळ गगनबावडा मार्गे होत असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा घाटमार्ग हा आहे. वाहनधारक आणि जनतेच्या मनातील प्रश्न हाती घेणार असल्याची माहिती श्री पारकर यांनी दिली.
कणकवली प्रतिनिधी





