डिगस -चोरगेवाडी ते हिर्लोक रस्ता कामात भ्रष्टाचार

मनसैनिक प्रसाद गावडे यांनी केली पोलखोल
मनसेची स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुक्यात पणदुर घोडगे राज्य महामार्गापासून डिगस चोरगेवाडी ते हिर्लोक गावाला जोडल्या जाणाऱ्या मार्गावर लुडबेवाडी कोठार देवालय येथे बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी करत पुलाच्या बांधकामाच्या दर्जाहीन कामाचा पर्दापाश केला आहे. या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी मनसेचे कुडाळ तालुका माजी अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या चोरगेवाडी हिर्लोक रस्त्यावरील लुडबेवाडी कोठार देवालय येथे अगदी सहा महिन्यांपूर्वी जवळपास तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पूल निकृष्ट असून या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसैनिक प्रसाद गावडे यांनी केला आहे. पुलावरील चिखलाच्या साम्राज्याने वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना प्रवास करताना मनःस्ताप होत होतो. जर ऑक्टोबर महिन्यात कमी पाऊस असूनसुद्धा पुलावर चिखलाचे साम्राज्य दिसत असेल तर पावसाळी हंगामात किती भयावह परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित केला आहे. या मार्गाला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या मुलांना दैनंदिन पुलावरून चालत जात असताना त्रास होत असून शासनाचा पैसा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या घशात घालण्यासाठी वापरला गेल्याचा घाणाघाती आरोप मनसेने केला आहे.
गणेशोत्सवापूर्वी ग्रामस्थांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता थातुरमातुर डागडुजी करून वेळ निभावून देण्याचे काम बांधकामच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी करत आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे कार्य केल्याचे सांगत या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.