कर्णबधिर मुलांसाठी कुडाळ लायन्स क्लबचा उपयुक्त उपक्रम

डॉ. अमोघ चुबे आणि सीए जयंती कुलकर्णी यांनी दिली माहिती  

निलेश जोशी । कुडाळ :  कर्णबधीर बालकांसाठी लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग ही संस्था   सेवाभावी वृत्तीने काम करत आहे.  कर्णबधीर मुलांना बोलता येण्यासाठी  ही चळवळ वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. कर्णबधिर मुल बोलू शकेल, पण त्यासाठी  सर्वांनी स्वरनाद आणि कर्णबधीर मुलांमधील दुवा होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बाल रोगतज्ज्ञ डॉ. अमोघ चुबे  आणि लायन्स क्लब कुडाळच्या  अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी यांनी केले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 
     लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग आणि कॉक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच पुरस्कृत स्वरनाद कर्णबधीर बालकांसाठी वाचा भाषा प्रशिक्षण केंद्र हे कुडाळ अभिनवनगर येथील लायन्स सेवा संकुल येथे सुरु आहे.  नुकतेच या केंद्राला एक वर्ष पूर्ण झाले.  या केंद्रात पाच मुले असून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम अनुषा कोरगांवकर करत आहेत.  याबाबत माहिती देण्यासाठी आज लायन सेवा संकुल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी सचिव स्नेहा नाईक, खजिनदार आनंद बांदीवडेकर, लायन्स पदाधिकारी श्रीनिवास नाईक, सीए सुनील सौदागर, डॉ दिपाली काजरेकर, डॉ प्राची तनपुरे, डॉ सुशांता कुळकर्णी, जीवन बांदेकर, मंजुनाथ फडके, अनुषा कोरगांवकर, मुले, पालक आदी उपस्थित होते. 
   यावेळी बोलताना डॉ अमोघ चुबे म्हणाले, प्रत्येक कर्णबधीर मुलांना  योग्य वेळी वाचा-भाषा प्रशिक्षण मिळाले तर हे मुल बोलणे शक्य आहे.  स्वरनाद कॉक्लिआ पुणे फॉर हिअरींग  अँण्ड स्पीस व लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने सुरू केलेले स्वरनाद हे वाचा भाषा प्रशिक्षण केंद्र आहे.   कर्णबधीर म्हणजे आवाज न ऐकु आल्यामुळे बोलता येत नाही.  असे दर एक हजार मुलांमागे चार  मुले ही कर्णबधीर म्हणून जन्माला येतात. या मुलांना योग्य वेळी  म्हणजेच सहा  वर्षाच्या आत, योग्य श्रवणयंत्र व वाचा भाषा प्रशिक्षण दिले गेले तर कायमस्वरुपी  या अपंगत्वावर मात करून ही मुले नॉर्मल मुलाप्रमाणे बोलू शकतात.   स्वरनादमध्ये आम्ही ० ते ६ वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देतो व त्यानंतर ती नॉर्मल शाळेत प्रवेश घेऊन सर्वसामान्य मूलांसोबत शिकू शकतात. 

    २४  सप्टेंबर २०२२ ला या उपक्रमाची सूरुवात शिबीर घेऊन करण्यात आली.  त्यात कुडाळ तालुक्यात पाच  मुले सापडली.  गेल्या वर्षी ६  ऑक्टोबर रोजी लायन्स सेवा संकुल अभिनवनगर येथे स्वरनादचे केंद्र सूरु करण्यात आले.  सध्या पाच  मुले प्रशिक्षण घेत आहेत.  त्यातील एक मुलगी कॉक्लिअर इम्प्लांट या शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे गेली आहे.  कॉक्लिआ इम्प्लांट या शस्त्रक्रियेमुळे मुलांना श्रवणयंत्रापेक्षा जास्त फायदा होतो.  योग्य वेळी निदान व उपचार तसेच पालकांचा सहभाग यामुळे हे सर्व शक्य आहे. म्हणूनच वाचा भाषा प्रशिक्षणामूळे मुलांना बोलते करणे शक्य आहे.    कर्णबधीर मूल बोलू शकेल.  लहान वयात जन्मजात कर्णबधीर बालकांना ओळखले पाहिजे.  त्यांना केंद्रावर आणले पाहिजे.अशा  मुलांसाठी  त्यांच्या पालकांपर्यंत आमच्या केंद्राची माहिती देणे आवश्यक आहे.  नवजात शिशू ते वयाच्या ६-७ वर्षापर्यंतच्या काळात योग्य वैद्यकीय उपचार, श्रवणयंत्र कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया व  वाचा प्रशिक्षणाच्या मदतीने अशी मुले बोलू लागतात.  यासाठी ही चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी सर्वांनी स्वरनाद आणि कर्णबधीर मुलांमधील दुवा होणे काळाची गरज आहे, असे सांगत कर्णबधीर मुल कसे ओळखावे? कर्णबधीरत्व येण्याची कारणे काय? याबाबत माहिती दिली. 
    यावेळी बोलताना जयंती कुलकर्णी म्हणाल्या, दरवर्षी लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या वतीने सामाजिक शैक्षणिक आरोग्य उपक्रमाने सेवा सप्ताह साजरा केला जातो.  या सेवासप्ताहात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  याचा १७ जणांनी लाभ घेतला.  माणगाव येथील गरजू मुलीला शिलाई मशीन देण्यात आली.   ८ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता  पिंगुळी स्नेहलता सदन येथील मुलींची आरोग्य तपासणी, जीवनावश्यक साहित्य वाटप, दुपारी दोन वाजता नाग्या महादू वेताळबाबर्डे येथील मुलांची आरोग्य तपासणी व जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.  ९ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे रस्ता सुरक्षा विषयावर नाईक मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्रीनिवास नाईक मार्गदर्शन करणार आहेत.  १२ ऑक्टोबरला सकाळी  ११ वाजता महिला हॉस्पिटल कुडाळ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे,  अशी माहिती अध्यक्ष सीए जयंती कुलकर्णी यांनी दिली. 

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!