आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात निषेध

देशात केंद्र सरकारची अघोषित आणीबाणी
जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचा आरोप
जिल्ह्यात आज आम आदमी पार्टीच्या वतीने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ जमलेले पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. देशात केंद्र सरकारने अघोषित आणीबाणी लावली असल्याची टीका यावेळी जिल्हाध्यक्ष ताम्हणकर यांनी केली आहे.
केंद्रातील मोदी सरकार अघोषित आणीबाणी लावत विरोधी पक्षातील नेत्यांना गदाआड करण्याचा प्रयत्न करत आहे. आम आदमी पक्षाची राज्यसभेतील बुलंद तोफ खासदार संजय सिंह यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर मध्य घोटाळ्याची खोटी केस दाखल करून दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे मत यावेळी जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे. खासदार संजय सिंह यांनी वेळोवेळी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी सरकारला तो आवाज फार काळ दाबता येणार नाही. देशातील जनता सुज्ञ असून आगामी काळात सरकारला जनताच धडा शिकवेल असे मतही त्यावेळी ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश माने, पप्या पवार यांच्यासह संदेश परब, बंटी पवार, आकाश पवार, महेश निकम, राम पवार आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी