खासदार हेमंत पाटील यांना अटक करून त्यांची खासदारकी रद्द करा!

कॅगमो संघटना राज्याध्यक्ष डॉ. दत्ता तपसे यांची मागणी

मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे यांना जातीय मानसिकतेतून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व त्यांना संडास साफसफाई करण्यास भाग पाडणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांना त्वरित अटक करून त्यांची खासदारकी रद्द होण्याची न्यायालयीन प्रक्रिया त्वरित सुरू करावी. अशी मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ दत्ता तपसे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
डॉ.शामराव वाकोडे हे नांदेड येथील शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून काम बघत आहेत. 24 तासात मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याची घटना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे. परंतु या घटनेस केवळ अधिष्ठातांना जबाबदार धरणे अत्यंत अन्यायकारक असून ह्या प्रकारास एकूण महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा , राज्यकर्त्यांची आरोग्याच्या प्रती अनास्था व बेजबाबदारपणा कारणीभूत आहे.
परंतु व्यवस्थेच्या दोषाचे सर्व खापर एकट्या अधिष्ठातांवर फोडण्याचा प्रकार खासदार हेमंत पाटील यांनी केला व काल दिनांक 3 ऑक्टोबर रोजी त्यांनी आदिवासी समाजाचे असणारे अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना जातीय शब्द वापरले व त्यांना जबरदस्तीने संडास साफसफाई करण्यास भाग पाडले.
अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी त्या व्यक्तीस संडास साफसफाई करण्यास भाग पाडले जाणे हा ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.
या अपमानास्पद वागणुकीमुळे डॉ. वाकोडे अत्यंत भयभीत झाले असून त्यांना प्रचंड मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे.
डॉ. वाकोडे यांनी काल रात्री पोलिसांमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे परंतु सदरचे खासदार हे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यावर प्रत्यक्षात कारवाई होईल की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे.कोणत्याही दबावाला बळी न पडता सदरच्या दोषी हेमंत पाटील यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना ॲट्रॉसिटी कायद्यानुसार त्वरित अटक व्हावी.तसे निवेदन मा मुख्यमंत्री यांना कॅगमो डॉक्टर संघटनेने दिले आहे. अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष डॉक्टर तपसे यांनी दिली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!