कुडाळ केळबाईवाडी येथे सापडली मानवी कवटी व हाडे ; याबाबत पोलीस तपास सुरू

कुडाळ : शहरातील केळबाईवाडी येथे ओहोळाच्या बाजूला मानवी कवटी व इतर हाडे सापडून आली आहेत. ही मानवी हाडे कोणाची आहेत ? आणि या ठिकाणी कशी आली ? यासंदर्भात कुडाळ पोलीस तपास करीत आहेत. तसेच या ओहोळानजीक असलेल्या कातकरी समाजाच्या वस्तीमधील बेपत्ता झालेल्या रामा सावळा पवार याचा मृतदेह आहे का ? याचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान डीएनए व इतर चाचण्या झाल्याशिवाय हा मृतदेह कोणाचा हे स्पष्ट होणार नाही.
केळबाईवाडी येथील वामन राऊळ हे केळीची पाने आणण्यासाठी ओहोळाच्या शेजारी असलेल्या जागेत गेले होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास ही मानवी कवटी व इतर हाडे दिसून आली. याबाबत त्यांनी आपल्या घरी सांगितले. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी कातकरी समाजाचे अर्जुन पवार याला या संदर्भात वामन राऊळ यांनी माहिती दिली.
या ओहोळानजीक कातकरी समाजाची वस्ती आहे, आणि या वस्तीमधून जुलै महिन्यामध्ये रामा सावळा पवार हे बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांची बहीण सुरेखा रामजी पवार हिने कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच अनुषंगाने वामन राऊळ यांनी ३० सप्टेंबर रोजी बाजारातून येत असलेल्या सुरेखा पवार हिचा मुलगा अर्जुन याला सांगितले की, ओहोळानजीक असलेल्या जागेत कवटी आणि इतर मानवी हाडे आहेत. बेपत्ता झालेल्या तुझ्या मामाचा हा मृतदेह आहे का ? याची पडताळणी करा, असे त्यांना सांगितले होते.
सुरेखा पवार तिचा मुलगा अर्जुन यांनी आपल्या आईला सांगितले की, वामन राऊळ यांनी मृतदेह सापडला असल्याचे सांगितले आहे. त्याची पाहणी करा असेही त्यांनी सांगितले आहे. रात्री उशीर झाल्यामुळे या पवार कुटुंबीयांनी (रविवारी) या मृतदेहाची पाहणी केली. पण मृतदेह सडलेला होता. कवटी आणि इतर हाडे होती. हा मृतदेह कोणाचा आहे ? हे सांगणे शक्य नसल्यामुळे त्यांनी यासंदर्भात विजय सावंत यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
कुडाळ केळबाईवाडी येथे मानवी कवटी व इतर हाडे सापडल्याचे समजताच कुडाळ पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक कराडकर, पोलीस हवालदार देवानंद माने हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मानवी हाडांची पाहणी केली आणि ती पंचनामा करून ताब्यात घेतली. यासंदर्भात इतर चाचण्या झाल्यानंतर हा मृतदेह कोणाचा आहे हे निश्चित होणार आहे.
मानवी हाडे पाठवणार तपासणीसाठी
कुडाळ केळबाईवाडी येथे सापडलेली मानवी हाडे ही तपासणीसाठी सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी पाठविण्यात येणार आहेत. या तपासणी मधून हा घातपात आहे की इतर कोणत्या कारणाने ही व्यक्ती मयत झाली आहे हे समजणार असून हा मृतदेह पुरुष की स्त्री जातीचा आहे हे देखील उघड होणार आहे. या तपासण्या झाल्यानंतर पुढील तपास पोलीस करणार आहेत.