डाॅ. विजय लाड यांना ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले संत साहित्य’ पुरस्कार जाहीर

वैभववाडी – साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा डॉ. निर्मलकुमार फडकुले संत साहित्य पुरस्कार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यास तथा दासबोध सखोल अभ्यासचे संचालक आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डाॅ.विजय वसंतराव लाड यांना नुकताच महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यावतीने घोषित झाला आहे. दासबोधावरील विविध संदर्भांकित पुस्तकांचे लिखाण व व्याख्याने करून त्यांनी संत साहित्य क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन डाॅ.लाड यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे अध्यक्ष संजय ईटकर आणि कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. वर्ष परंपरेप्रमाणे डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या नावाने संत साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंतास आणि प्रज्ञावंतास ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले संत साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. डाॅ.लाड यांनी गेल्या अनेक वर्षापासून संत साहित्याच्या क्षेत्रात प्रचंड कार्य केले आहे. त्यांनी लिखाण केलेला ‘दासबोध चिंतनसार’ हा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला. संत रामदासांच्या विचारधारेला समाजापर्यंत घेवून जाण्यात आपण यशस्वी झाल्याचा उल्लेख करत डाॅ. लाड यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथामुळे संत साहित्याला समृध्दी प्राप्त झाली आहे. डाॅ. लाड यांच्या सर्वांगीण प्रतिभेचे दर्शन घडविताना संत साहित्य क्षेत्रात त्यांनी मौलिक कामगिरी बजावली आहे. मराठी वाङमयीन संस्कृती घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठी संत साहित्याच्या माध्यमातून डाॅ. लाड यांनी केलेल्या मोठ्या सांस्कृतिक कार्याची दखल घेवून यावर्षीचा ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले संत साहित्य’ पुरस्कार डाॅ. विजय लाड यांना महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांनी घोषित केल्याचे पत्रकात म्हटले आहे. या पुरस्काराचे स्वरुप रोख रूपये २,१००/-, मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ व पुष्पगुच्छ असे आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ५.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथिल माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते आणि म.सा.प.चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!