“आपले वाचनालय”चा राजापूर. गोतावडे वाडी येथे उत्साहात शुभारंभ

राजापूर ( प्रतिनिधी): कोंडिवळे गोतावडेवाडी (ता. राजापूर) येथे "आपले वाचनालय" या मोफत वाचनालयाचा शुभारंभ गोपालकालाच्या शुभदिनी करण्यात आला. संजय कुळये व सौ. मुग्धा कुळये यांनी आपल्याकडील स्वतःची ३०० हून अधिक पुस्तके, तसेच खजिना बालवाचनालय या संस्थेकडून मिळालेली १००हून अधिक पुस्तके या वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये लहान मुलांपासून वृध्दांपर्यंतच्या सर्व वयोगटातील वाचकांसाठी पुस्तके असून यामध्ये कथा, कविता, कादंबऱ्या, आत्मचरित्र, धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, व्याकरण, निबंध, वैचारिक, ललित लेख, शब्दकोश अशा विविध प्रकारची पुस्तके
वाचण्यासाठी मोफत मिळणार आहेत.
आज मोबाईल आणि प्रसार माध्यमांच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वाचनापासून दूर गेली आहेत. सध्या पुस्तकांच्या वाढत्या किंमतीमुळेही पुस्तके विकत घेऊन वाचणे सामान्य लोकांना शक्य होत नाही. वाडी वस्तीवरील मुलांमध्ये तसेच समाजामध्ये वाचन संस्कृती पुन्हा रुजावी आणि सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडावेत या हेतूने हे मोफत वाचनालय आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिनी सुरू करत असल्याचे वाचनालयाच्या संचालिका सौ. मुग्धा कुळये यांनी सांगितले. वाचनालयाच्या उदघाट्न प्रसंगी श्री. चंद्रकांत जानस्कर, नंदकुमार गोतावडे, प्रदीप कुळये, चिन्मय कुळये, सुवर्णा कुळये, गार्गी कुळये,अन्य ग्रामस्थ व मुलं मोठया संख्येने उपस्थित होती.